गणेशोत्सव तोंडावर आला आहे. त्यामुळे सार्वजनिक गणेशत्सोव मंडळाकडून पूर्व तयारीला सुरुवात झाली आहे. गणेशोत्सवात सुरक्षेचा एक भाग म्हणून मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणनू ओळखल्या जाणार्या गौड सारस्वत ब्राह्मण (GSB) च्या मंडळाने यावर्षी तब्बल 360 कोटी रुपयांचे विमा संरक्षण (Insurance) घेतले आहे. मंडळाने न्यू इंडिया अॅन्शुरन्स या कंपनीकडून हे विमा संरक्षण घेतले आहे.
विमा पॉलिसीमध्ये समावेश
राज्याची राजधानी मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून जीएसबी गणपती प्रसिद्ध आहे. यंदाच्या उत्सवात गणपती मूर्तीची 66 किलो सोन्याचे दागिने तर 295 किलो चांदिच्या दागिण्यांचा वापर करून सजावट करण्यात येणार आहे. त्यामुळे या विमा पॉलिसी घेताना या दागिण्यांची सुरक्षा, यासह मंडळाचे कार्यकर्ते, दर्शनाला येणाऱ्या गर्दीचा विचार करता भाविकांनाही विमा संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. तसेच नैसर्गिक आपत्तीच्या माध्यमातून होणारे नुकसान यासाठी देखील मंडळाकडून विमा संरक्षण घेण्यात आले आहे. यामध्ये मंडळाचे स्वयंसेवक आणि कर्मचार्यांच्या वैयक्तिक अपघात संरक्षण म्हणून सर्वाधिक 289.50 कोटी रुपयांचे विमा संरक्षण घेण्यात आले आहे.
गेल्या वर्षीपेक्षा जास्त विमा संरक्षण
गणेश मंडळाकडून घेण्यात आलेले हे विमा संरक्षण गेल्या वर्षीच्या तुलनेत जास्त आहे. गेल्या वर्षी मंडळाने 316 कोटींचा विमा उतरवला होता. मात्र यंदा त्यामध्ये वाढ झाली आहे. सोन्याच्या दरात वाढ झाल्याने विमा संरक्षणाच्या किमतीमध्ये वाढ करण्यात आली असल्याचे मंडळाच्या पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले आहे. हे विमा संरक्षण संपूर्ण गणेशोत्सावाच्या कालावधीसाठी लागू राहणार आहे.