भारताचे लक्ष चीनसोबतच्या एकूण व्यापारातील तूटीवर न ठेवता काही महत्त्वाच्या वस्तूंच्या आयातीवरील अवलंबित्व कमी करण्यावर असायला हवे. NITI आयोगाचे उपाध्यक्ष सुमन बेरी (Suman Bery) यांनी रविवारी ही माहिती दिली. बेरी यांच्या मते, सक्रिय फार्मास्युटिकल घटक (API- Active Pharmaceutical Ingredients) आणि नूतनीकरणक्षम उर्जेसाठी पुरवठा साखळीसह प्रमुख कच्च्या मालाच्या पुरवठ्याच्या इतर स्त्रोतांमध्ये विविधता आणण्याची गरज आहे. चीन जगातील सर्वात मोठा उत्पादक आणि APIs निर्यात करणारा देश आहे आणि अनेक भारतीय कंपन्या विविध औषधांच्या उत्पादनासाठी सामग्रीच्या आयातीवर अवलंबून आहेत.
भारत आणि चीनमधील व्यापार विक्रमी पातळीवर
बेरी म्हणाले की, भारताचे लक्ष चीनसोबतच्या व्यापारी तुटीवर नसले पाहिजे. त्याऐवजी, काही महत्त्वाच्या गोष्टींसाठी चीनवरील आपले अवलंबित्व कमी करण्यावर असले पाहिजे. चीनसोबतची वाढती व्यापार तूट कमी करण्यासाठी भारताने काय उपाययोजना कराव्यात, असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता.
बेरी पुढे म्हणाले की, गेल्या सात वर्षांत अमेरिका आणि चीनसारख्या बड्या शक्तींनी व्यापार परस्परावलंबनाला एक शस्त्र म्हणून निवडले, हे खरे तर दुर्दैवी आहे. आकडेवारीनुसार, 2022 मध्ये भारत आणि चीनमधील व्यापार $135.98 अब्ज डॉलर्सच्या सर्वकालीन उच्चांकावर पोहोचले आहे. यादरम्यान भारताची चीनसोबतची व्यापार तूट प्रथमच 100 अब्ज डॉलरच्या पुढे गेली आहे. चीनसोबतची व्यापारी तूट कमी करण्यासाठी भारताने क्षेत्रनिहाय रणनीती तयार केली पाहिजे, असेही ते म्हणाले.
चीनने भारताला $118.5 अब्ज किमतीच्या वस्तूंची निर्यात केल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. हे आकडे 2021 च्या तुलनेत 21.7 टक्के अधिक आहे. दुसरीकडे, चीनने भारतातून केवळ 17.48 अब्ज डॉलरच्या वस्तूंची आयात केली आहे. हे 2021 च्या तुलनेत 37.9 टक्के इतके कमी आहे. अशाप्रकारे भारताची चीनसोबतची व्यापार तूट $101.02 अब्ज पर्यंत पोहोचली आहे. 2021 मध्ये हे आकडे $69.38 अब्ज इतके होते.
चीनसोबतची भारताची व्यापार तूट 100 अब्ज डॉलर्सचा टप्पा ओलांडण्याची ही पहिलीच वेळ आहे. ही परिस्थिती भारतासाठी चिंताजनक आहे, कारण भारताने चीनसोबतच्या वाढत्या व्यापार तुटीबाबत अनेकदा चिंता व्यक्त केली आहे, परंतु उपाययोजना झालेल्या नाहीत.