Online Game Jihad: शाळेत जाणाऱ्या मुलांमध्ये आणि तरुणांमध्ये ऑनलाईन गेमचे वाढते आकर्षण पाहता ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकार नियमावली तयार करत आहे. लवकरच या नियमावलीला सरकारकडून मान्यता दिली जाणार आहे.
गेल्या दिवसांपासून Online Game च्या माध्यमातून धर्मांतरण किंवा धार्मिक गोष्टींमध्ये मुलांना अडकवले जात असल्याच्या घटना सामोर येत आहेत. ऑनलाईन गेमिंगमुळे बऱ्याच दुष्परिणामांना सामोरे जावे लागत आहे. काही ऑनलाईन गेम मुले पैसे लावून खेळत असल्यामुळे पालकांना आर्थिक नुकसानीलादेखील सामोरे जावे लागत आहे. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी आणि ऑनलाईन गेमिंग करणाऱ्या मुलांवर नियंत्रण आणण्यासाठी सरकारकडून नियमावली तयार केली जात आहे.
ऑनलाईन गेमिंगमुळे आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ
ऑनलाईन गेमिंग ही सर्वांत जलदगतीने वाढणारी इंडस्ट्री आहे. पण याचे दुष्परिणाम देखील तितकेच आहे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे शाळेत आणि कॉलेजला जाणारी मुले ही याच्या आहारी जात आहेत. त्यातून त्यांना बाहेर काढणे अवघड होत आहे. ऑनलाईन गेम खेळल्यामुळे मुलांमधील चिडचिडेपणा वाढला आहे. कौटुंबिक हिंसाचाराच्या आणि आर्थिक फसवणुकीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यात आता नव्याने गेम जिहाद हा नवीन ट्रेंड येऊ लागला आहे.
काय आहे गेम जिहाद?
ऑनलाईन गेमद्वारे जसे पूर्वी मुलांकडून व्हर्च्युअली हिंसा करून घेतली जात होती. त्याचप्रमाणे आता गेमद्वारे मुलांचे धार्मिक परिवर्तन करण्याचा प्रयत्न केला जात आहे. टप्प्याटप्प्यात मुलांशी ऑनलाईन गेम खेळत त्यांच्यापर्यंत इतर धर्माची माहिती पोहोचवली जाते. तसेच काही गेममध्ये थेट मुलांशी चॅटिंग करून त्यांना धर्मांतराबाबत किंवा दुसऱ्या धर्माचे फायदे सांगितले जात आहेत. या अशा गेम जिहादच्या माध्यमातून जवळपास 400च्या आसपास मुलांचे धर्मांतरण केल्याचे सांगितले जात आहे.
ऑनलाईन गेम खेळताना मुले प्राईस आणि फक्त जिंकणे याबाबत खूपच आग्रही असल्याचे दिसून येते. अशावेळी मुलांना गेम जिंकण्यासाठी पैशांचे आमिष दाखवणे तसेच त्यांनी सांगितलेल्या धर्मातील कृती केल्यानंतर मुलांना बोनस पॉईंट देणे. अशा माध्यमातून मुलांचे ब्रेनवॉश करणे सुरू आहे. या अशा सर्व गोष्टींवर आळा बसावा यासाठी सरकारकडून नियमावली तयार केली जात आहे.
50 कोटी युझर्सपैकी 25 टक्के युझर्स पैसे भरून खेळतात
सध्या भारतात जवळपास 50 कोटीहून अधिक ऑनलाईन गेम खेळणारे अॅक्टिव्ह युझर्स आहेत. यामध्ये 25 टक्के युझर्स पैसे भरून गेम खेळत आहेत. तर दुसरीकडे प्रत्येक वर्षी ऑनलाईन गेमिंग इंडस्ट्रीची 30 टक्क्यांनी वाढ होत आहे. 2025 पर्यंत ही इंडस्ट्री सुमारे 50 हजार कोटीपर्यंत जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे.