Chandrayaan-3 Mission: चांद्रयान-3 मोहीम ही भारतासाठी खूप विशेष आहे. जिथे आतापर्यंत कोणताही देश पोहोचला नाही. तिथे म्हणजे चंद्राच्या दक्षिण भागात भारताचे चांद्रयान लॅण्ड होणार आहे. या मिशनवर भारताने कोट्यवधी रुपये खर्च केले आहेत. भारताने आतापर्यंत 3 चांद्रयान मोहिम पार पाडल्या आहेत. त्याचा एकूण खर्च 1 हजार 979 कोटी रुपये झाला आहे. तर आताच्या चांद्रयान-3 साठी 615 कोटी रुपयांचा खर्च झाला आहे. या खर्चामध्ये अनेक सरकारी आणि खाजगी कंपन्यांची इस्त्रोच्या मोहिमीसाठी मदत झाली आहे.
आजची चांद्रयान मोहीम यशस्वी झाली तर 23 ऑगस्ट, 2023 या दिवसाची सुवर्ण अक्षरात नोंद होईल. आज सायंकाळी 6 ते 6.30 च्या दरम्यान चांद्रयान-3 मिशनचे चंद्रावर लॅण्डिंग होणार आहे. या मोहिमेसाठी सरकार आणि इस्त्रोकडून भरपूर मेहनत घेतली जाते. त्याचबरोबर यासाठी भरमसाठ पैसादेखील खर्च केला जातो. आतापर्यंत चांद्रयान मोहिमेमध्ये अमेरिका, चीन आणि रशिया या देशांनीच यश मिळवले आहे. त्यात भारतही आहे. पण यावेळचे मिशन हे सर्वांना आश्चर्यचकित करायला लावणारे असणार आहे. या मिशनसाठी वैज्ञानिकांबरोबरच देशातील सरकारी आणि प्रायव्हेट कंपन्यांचाही खारीचा वाटा आहे. या कंपन्यांनी या मोहिमेत कशाप्रकारे इस्त्रोला मदत केली, हे जाणून घेऊ.
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL)
चांद्रयान-3 मिशनसाठी ज्या बॅटरी वापरण्यात आल्या. त्या बॅटरी भेल कंपनीने पुरवल्या आहेत. भारत हेवी इलेक्ट्रिकल्स ही एक सरकारी कंपनी आहे. या कंपनीच्या वेल्डिंग रिसर्च विभागाने चांद्रयान-3 मोहिमेच्या मिशनसाठी मेटॅलिक अॅडॉप्टर्स उपलब्ध करून दिले आहेत.
लार्सन अॅण्ड टर्बो (L&T)
लार्सन अॅण्ड टर्बो ही भारतातील एक नामांकित खाजगी इंजिनिअरिंग आणि कन्स्ट्रक्शन कंपनी आहे. या कंपनीने चांद्रयान-3 मोहिमेसाठी अनेक प्रकारच्या गोष्टींची मदत केली आहे. चांद्रयान-3 च्या लॉन्चिंगसाठी लागणारे बूस्टर सेगमेंट एल अॅण्ड टी ने तयार केले आहे. तसेच वेगवेगळ्या प्रकारचे सेगमेंट आणि वापरलेले नोजल बकेट फ्लेज हे सुद्धा L&T ने पुरवले आहेत.
एमटीएआर टेक्नॉलॉजी (MTAR Technologies)
एमटीएआर टेक्नॉलॉजी ही एक खाजगी कंपनी असून, या कंपनीने चांद्रयान-3 मोहिमेसाठी इंजिन आणि बूस्टर पंपसोबत अनेक प्रकारचे साहित्य पुरवले आहे. त्याचप्रमाणे गोदरेज एअरस्पेस या खाजगी कंपनीने सीई20 इंजिन थ्रस्ट चेंबर आणि L110 सह अनेक प्रकारचे सुटे भाग पुरवले आहेत.
याचबरोबर मिश्रा धातू निगम ही सार्वजनिक क्षेत्रातील कंपनीने कोबाल्ड बेस एलॉईज, नकेल बेस एलॉईज, टायटेनियम एलॉईज आणि स्पेशल स्टील पुरवले आहे. या सामग्रीचा वापर लॉन्च व्हेईकल तयार करण्यासाठी केला जातो. त्याचबरोबर अनिकेत एअरोस्पेस कंपनीने स्टेनलेस स्टील, टायटेनिअम बोल्ट तर वालचंदनगर इंडस्ट्रीजने बूस्टर सेगमेंटचा पुरवठा केला आहे. अशाप्रकारे या चांद्रयान मोहिमेमध्ये देशातील वैज्ञानिकांबरोबरच खाजगी, सरकारी क्षेत्रातील कंपन्यांचे/कर्मचाऱ्यांचे हात लागले आहेत.