Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Chandrayaan3Landing: केंद्र सरकारने आतापर्यंत तीन चंद्र मोहीमांसाठी केला इतका कोटींचा खर्च

Chandrayaan-3 Mission

Image Source : Businesstoday.in

Chandrayaan3Landing: भारताने आतापर्यंत केलेल्या तीन चंद्र मोहीमांसाठी एकूण 1 हजार 979 कोटी खर्च केले आहेत. वर्ष 2008 मध्ये भारताने पहिल्यांदा चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. 2008 मधील चांद्रयान 1 मोहीम हाती घेण्यात आली होती.

भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्त्रो) चंद्राच्या दिशेने सोडलेले चांद्रयान-3 हे यान आज 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या पृष्ठभागावर उतरणार आहे. चांद्रयान-3 च्या लॅंडिंगकडे भारतातीलच नव्हे तर जगभरातील शास्त्रज्ञांचे लक्ष लागले आहे. चंद्राचा दक्षिण भागात चांद्रयान-3 उतरणार असून त्याचे यशस्वी लॅंडिंग झाल्यास भारत इतिहास रचणार आहे. (India's Chandrayaan-3 Mission)

भारताने आतापर्यंत तीन चांद्र मोहीम केल्या आहेत. इस्त्रोच्या सातत्यपूर्ण संशोधनातून या मोहीमांचा कालावधी हा पूर्वीच्या मोहीमांपेक्षा कमी होत गेला. चांद्रयान-3 ही मोहीम अंतिम टप्प्यात असून आज बुधवारी सायंकाळी चंद्राच्या पृष्ठभागावर चांद्रयान-3 उतरणार आहे. यानातील लॅंडर विक्रम आणि रोव्हर प्रज्ञान चंद्रावर उतरण्यास सज्ज झाले आहेत.

भारताने आतापर्यंत केलेल्या तीन चंद्र मोहीमांसाठी एकूण 1 हजार 979 कोटी खर्च केले आहेत. वर्ष 2008 मध्ये पहिल्यांदा चंद्राच्या दिशेने झेप घेतली होती. 2008 मधील चांद्रयान 1 मोहीम हाती घेण्यात आली होती. चांद्रयान-1 मोहीमेसाठी जवळपास 386 कोटी इतका खर्च आला होता.

चांद्रयान-2 मोहीमेसाठी सरकारने एकूण 978 कोटी खर्च केले होते. यात ऑर्बिटर, लॅंडर, रोव्हर यासाठी 603 कोटींचा खर्च झाला होता. चांद्रयान -2 मोहीम थोडक्यासाठी हुकली होती. चंद्राच्या पृष्ठभागावर यान उतरताना संपर्क तुटला होता. रॉकेटसाठी 305 कोटींची तरतूद करण्यात आली होती.

चांद्रयान-2 मध्ये अपयश मिळूनही इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी चिकाटी सोडली नाही. इस्त्रोच्या शास्त्रज्ञांनी चांद्रयान-3 मोहीम हाती घेतली. त्यावर  काम करुन पुन्हा चंद्राच्या दिशेने झेपावले. इस्त्रोचे अध्यक्ष के. सिवन यांच्या माहितीनुसार चांद्रयान-3 साठी 615 कोटींचा खर्च आला आहे. यात लॅंडर रोव्हरसाठी 250 कोटी आणि रॉकेट लॉंचरसाठी 365 कोटींचा खर्च आला आहे.

गेल्या महिन्यात 14 जुलै रोजी चांद्रयान 3 चे आंध्र प्रदेशातील श्रीहरिकोटा येथून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले होते. 5 ऑगस्ट 2023 रोजी चांद्रयान 3 ने यशस्वीपणे चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला होता. सात आठवड्यांच्या अविरत प्रवासानंतर चांद्रयान -3 चंद्राच्या समीप पोहोचले आहे. इस्त्रोच्या ताज्या माहितीनुसार चांद्रयान 3 चे आज बुधवारी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास सॉफ्ट लॅंडिंग होण्याची शक्यता आहे.