गोल्ड लोन अर्थात सोने तारण कर्ज हे अतिशय सोपे आणि तात्काळ कर्जाचा प्रकार आहे. सोने तारण कर्ज हे बँकांसाठी किंवा गोल्ड लोन कंपन्यांसाठी सुरक्षित कर्ज मानले जाते. कारण यात बँक किंवा कंपनीकडे सोने तारण ठेवल्याने जोखीम शून्य असते. कर्ज बुडवल्यास बँक ग्राहकाचे तारण सोने लिलाव करुन कर्ज वसुली करु शकतात.
सर्वसाधारणपणे सोन्याची शुद्धता, वजन आणि बाजार भाव यावरुन गोल्ड लोन किती द्यायचे हे बँकांकडून ठरवले जाते. त्यामुळे गोल्ड लोनमध्ये सिबिल स्कोअरबाबत फारसे महत्व दिले जात नाही. तुमच्या जवळील सोन्यावरुनच तुम्हाला कर्ज मिळते.
मागील काही वर्षात गोल्ड लोनची बाजारपेठ प्रचंड वाढली आहे. लॉकडाऊनमध्ये सोन्याचा भाव प्रती 10 ग्रॅम 56200 रुपयांच्या विक्रमी पातळीवर गेला होता. यामुळे गोल्ड लोनमधून मिळणारी रक्कम देखील वाढली.
सोन्याचा भाव उच्चांकी गेल्याने अनेकांनी कर्जासाठी सोने तारण ठेवून कर्ज घेतल्याचे रिझर्व्ह बँकेच्या अहवालात दिसून आले होते. गोल्ड लोन व्यवसायात तीव्र स्पर्धा असल्याचे सुवर्ण कर्जावरील व्याजदरावरुन दिसून येते. बँकांबरोबच एनबीएफसी कंपन्या आणि गोल्ड लोन देणाऱ्या कंपन्यांमध्ये गोल्ड लोनचे व्याजदर प्रचंड स्पर्धात्मक आहेत.
काही निवडक बँकांचा विचार केला तर एचडीएफसी बँकेचा गोल्ड लोनचा व्याजदर 8 ते 16.50% इतका आहे. कोटक महिंद्रा बँकेचा गोल्ड लोन रेट 8 ते 17% या दरम्यान आहे. साऊथ इंडियन बँकेकडून सोने तारण कर्जावर 8.25% ते 19% व्याजदर आकारला जातो. सेंट्रल बँक ऑफ इंडियाकडून 8.45% ते 8.55% या दरम्यान गोल्ड लोन ऑफर केले जाते. युको बँकेचा गोल्ड लोन रेट 8.50% इतका आहे.
गोल्ड लोन घेताना ग्राहकाला प्रोसेसिंग फी, व्हॅल्यूएशन चार्जेस, प्री क्लोजर चार्जेस, ईएमआय भरण्यास विलंब झाल्यास शुल्काचा भुर्दंड सोसावा लागतो. त्यामुळे ग्राहकाने गोल्ड लोन घेताना बँकांच्या विविध शुल्काबाबत विचारणा करणे आवश्यक आहे.