शेअर मार्केटमध्ये आलेल्या तेजीच्या लाटेत रिअल इस्टेटमधील गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर वधारला आहे. आज 31 मार्च 2023 रोजी सकाळच्या सत्रात गोजरेज प्रॉपर्टीजचा शेअर 2.77% तेजीसह 1056.30 रुपयांवर गेला. गोदरेज प्रॉपर्टीजने दोन कंपन्यांमध्ये अतिरिक्त हिस्सा खरेदी केला आहे. त्यामुळे आज शेअर बाजारात गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरची मागणी वाढली.
गोदरेज प्रॉपर्टीजने मुंबई शेअर बाजाराला सादर केलेल्या निवेदनानुसार वंडर सिटी बिल्डकॉन आणि गोदरेज होम्स कन्स्ट्रक्शन या दोन कंपन्यांमध्ये गोदरेज प्रॉपर्टीजने हिस्सा 25.1% वरुन 74% इतका वाढवला आहे.या दोन्ही कंपन्या आता गोदरेज प्रॉपर्टीजच्या मालकीच्या होणार आहेत. या डीलनंतर आज शेअर बाजारात गोजरेज प्रॉपर्टीजमध्ये तेजी दिसून आली. सकाळच्या सत्रात गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर 1056.30 रुपयांवर गेला होता.सध्या तो 1036.20 रुपयांवर ट्रेड करत आहे. त्यात 1.42% वाढ झाली.
गोदरेज प्रॉपर्टीजची एकूण मार्केट कॅप 28810.53 कोटी इतकी आहे. गोदरेज प्रॉपर्टीजच्या शेअरने 1715.40 रुपयांचा 52 आठवड्यांचा उच्चांकी स्तर गाठला तर 1005.70 रुपयांचा नीचांकावर हा शेअर पोहोचला होता.या शेअरवरील परताव्याचे प्रमाण हे 4.06% इतके आहे. शेअरचे बिटा मूल्य 1.27 इतके आहे. गोदरेज निफ्टीमधील शेअरच्या तेजीने राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निफ्टीला बळकटी मिळाली. निफ्टीने 17300 अंकांचा टप्पा ओलांडला होता.
आजच्या सत्रात गोदरेज प्रॉपर्टीजच्या 1.39 कोटी शेअर्समध्ये ट्रेड झाला.यापूर्वी बुधवारी 29 मार्च रोजी गोदरेज प्रॉपर्टीजचा शेअर 1021.70 रुपयांवर स्थिरावला होता.31 डिसेंबर 2022 अखेर गोदरेज प्रॉपर्टीजमध्ये प्रवर्तकांचा 58.48% हिस्सा आहे.तर परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांचा 27.41% आणि स्थानिक संस्थात्मक गुंतवणूकदाराचा 4.4% हिस्सा आहे.
गोदरेज प्रॉपर्टीजच्या नफ्यात 50% वाढ
चालू आर्थिक वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीत गोदरेज प्रॉपर्टीजला 58.74 कोटींचा नफा झाला होता. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत 50.81% इतकी वाढ झाली होती. 31 डिसेंबर 2022 अखेर कंपनीला विक्रीतून 404.58 कोटींचा महसूल मिळाला होता. यंदा महसुलात 13.35% वाढ झाली होती.वर्ष 2021-22 मधील तिसऱ्या तिमाहीत कंपनीला 369.2 कोटींचा महसूल मिळाला होता.
आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी बाजारात जोरदार तेजी
आज आर्थिक वर्षाच्या शेवटच्या दिवशी शेअर मार्केटमध्ये प्रचंड तेजी दिसून आली आहे. आज शुक्रवारी मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स 740 अंकांनी वधारला आणि तो 58700 अंकांवर पोहोचला.राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 191 अंकांनी वधारुन 17270 अंकांवर पोहोचला. सेन्सेक्समधील 30 पैकी 28 शेअर तेजीत होते. आयटीसी आणि एशियन पेंट्स या शेअर्समध्ये घसरण झाली.