Gauri Pujan Market: गौरीपूजन हा महाराष्ट्रातील विशेष सण मानला जातो. प्रतिवर्षी भाद्रपद महिन्यामध्ये शुद्ध पक्षात अनुराधा नक्षत्रावर आपापल्या कुलाचाराप्रमाणे भाविक आपआपल्या घरी महालक्ष्मी (गौरी) ची स्थापना करतात. त्यानंतर ज्येष्ठा नक्षत्रावर गौरीची पूजा करतात व महानैवेद्य दाखवितात. तिसऱ्या दिवशी म्हणजेच मूळ नक्षत्रावर गौरींचे विसर्जन करतात. असा हा तीन दिवसांचा सण अत्यंत शिष्टाचारात साजरा केला जातो. यावर्षी 21 सप्टेंबर रोजी महालक्ष्मीचे आवाहन आहे. दरम्यान, सोन पावलांनी येणाऱ्या या गौरींच्या सणामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध होतोय.
Table of contents [Show]
चितार ओळीत भाविकांची गर्दी
नागपूर शहरातील चितार ओळी येथे गौरींच्या मूर्तीं आणि सजावटीचे साहित्य खेळण्यांनी दुकाने सजली आहे. संपूर्ण नागपूर जिल्ह्यातील सर्व भाविक याच चितार ओळीत गौरी खरेदी करण्यास येत असतात. त्यामुळे गौरी आवाहन मुहूर्ताच्या 1 महिन्या अगोदर पासुनच येथे भाविकांची गर्दी बघायला मिळते. या चितार ओळीमध्ये अगदी तीन पिढ्यांपासुन गौरी मूर्ती, तिचे अलंकार आणि वस्त्र विकणाऱ्या व्यावसायिकांचा व्यवसाय सुरु आहे. तसेच गौरी गणपतीसाठी लागणारे सजावटीचे साहित्य तयार करणारे आणि विक्री करणारे अनेक हस्तकलाकारांना या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे.
कोटी रुपयांची उलाढाल
जे भाविक आपआपल्या घरी दरवर्षी गौरीचे आवाहन करतात, ते त्यांच्या घरी लग्नकार्य झाल्यास नवीन गौरींची स्थापना करतात. तर काही भाविक प्रत्येक वर्षी नवीन गौरींची स्थापना करतात. तर काही भाविक नवस बोलून त्याप्रमाणे नवीन गौरींची स्थापना करीत असतात, अशी माहिती गौरी विक्रेत्यांनी दिली. चितार ओळीमध्ये 8 हजार रुपयांपासुन ते 20 हजार रुपयांपर्यंतच्या गौरी मूर्ती त्यांच्या बाळांसह विक्रीस उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील सर्व व्यावसायिकांची या सणानिमित्त होणारी एकूण आर्थिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.
सजावटीच्या साहित्यांला जास्त मागणी
त्याचप्रमाणे 500 ते 1000 रुपये दरम्यान महालक्ष्मीच्या (गौरी) बाळांचे कपडे, 1000 रुपयांपासुन ते 10 हजार रुपयांपर्यंत किमतीच्या गौरीच्या साड्या, गौरीला घालायच्या फेटे 500 रुपये जोडी याप्रमाणे विक्रीस उपलब्ध आहेत. तसेच गौरीला पावन असलेले कापसापासून तयार केलेले पौत्यांचे हार 600 ते 800 रुपये किमतीला आहेत. गौरीला सजविण्यासाठी लागणारे सर्व अलंकार जसे की पैंजण, गळ्यातील मोठा हार, कमरपट्टा, बाजूबंद, मुकुट,नथ, कानातले, ठूसी यासारख्या सर्व वस्तूंची किंमत 100 रुपयांपासून ते 3000 रुपयांपर्यंत आहे. यासह खेळणी प्लास्टिक फुलांच्या माळा, लाईटनिंग यालाही मोठ्या प्रमाणात मागणी वाढली आहे. या सर्व वस्तुंच्या खरेदी विक्रीच्या माध्यमातून बाजारात कोट्यवधीची उलाढाल होत आहे. सर्वसाधारण विक्रेता देखील या सण उत्सवाच्या काळात 1.5 ते 2 लाखांची माल विक्री करून नफा मिळवताना दिसून येत आहे..
अनेकांना मिळतो रोजगार
गौरी घडविणाऱ्या कलाकारांना चितार ओळीत दिवसाला 500 रुपये मानधन दिले जाते. तसेच गौरी विसर्जनाच्या दिवशी सोहळ्याचा स्वयंपाक करुन देणारे कॅटरर्स सुध्दा आता उपलब्ध झाले आहेत. यामध्ये 450 रुपये थाळी पासुन ते 1200 रुपये थाळी पर्यंतचे त्यांचे दर आहेत. यासह मिठाई विक्रेते, हार फुले विक्रेते, पूजा साहित्य विक्रीच्या माध्यमातून अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. तसेच गौरीची सजावट करण्यासाठी लागणारा लोखंडी मंडप, गौरी उभ्या करण्यासाठी लागणारे स्टील किंवा लोखंडाचे ढाचे याची देखील मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. त्यामुळे यामाध्यमातून फैब्रिकेटर व्यावसायिकांचाही व्यवसाय तेजीत आहे
शेतकऱ्यांनाही होतो नफा
स्थळाप्रमाणे महालक्ष्मीच्या पूजेची पध्दत बदलत असते. विदर्भात ज्या दिवशी या ज्येष्ठा गौरींचे आगमन होते. त्या दिवशी संध्याकाळी त्यांना अंबाडीची भाजी आणि ज्वारीच्या भाकरीचा नैवेद्य दाखविला जातो. विदर्भात ज्वारीचे उत्पादन होत असल्याने येथे नैवेद्यात भाकरीचे महत्व आहे. तसेच इतर दिवशी 20 ते 30 रुपये किलो दराने विकली जाणारी आंबाडीची भाजी या दिवशी 70 ते 80 रुपये किलो दराने विकली जाते. त्यामुळे शेतकऱ्यांना काहीसा आर्थिक नफा होतो.