• 27 Sep, 2023 00:03

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Ganeshotsav 2023: गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गणेश मूर्तीसह विविध साहित्यांच्या मागणीत वाढ, कोटींची उलाढाल

Ganeshotsav 2023

Ganeshotsav 2023: यंदा 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत आहे. गणरायाच्या आगमना करिता संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. माती, शाडू माती, पीओपी असे विविध प्रकारचे गणपती बाजारपेठेत विक्रीस उपलब्ध आहेत. यासोबतच मखर, विविध सजावटीचे साहित्य तसेच धूप, अगरबत्ती यासारख्या पूजेच्या सामानाने संपूर्ण बाजारपेठ सजली आहे.

Ganeshotsav Market: 19 सप्टेंबर रोजी गणरायाचे आगमन होत असल्याने भक्तांमध्ये उत्साह ओसंडून वाहत आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या गणरायाच्या स्वागताकरिता संपूर्ण बाजारपेठ सज्ज झाली आहे. दरवर्षी गणेशोत्सव सणाच्या पार्श्वभूमीवर मार्केटमध्ये कोटी रुपयांची उलाढाल होत असते. विविध प्रकारचे गणपती विक्रेता, मखर, मुकुट, गळ्यातील हार, इतर सजावटीचे साहित्य, धूप, अगरबत्ती, लायटिंग, ढोल-ताशा पथक, मंडप डेकोरेशन या सर्व व्यावसायिकांची कोट्यवधींची उलाढाल या काळात होत असते. 

पर्यावरणपूरक गणेशोत्सवास प्राधान्य

नागपूर महानगर पालिकेने पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पुढाकार घेतला आहे. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी मातीच्या आणि शाडू मातीच्याच गणेश मूर्तींची दुकाने थाटलेली दिसत आहेत. असे असले तरीही छूप्या मार्गाने का होईना दुकानदार पीओपीच्या मूर्ती विक्री करीत असल्याचे नागरिकांकडून सांगण्यात येत आहे. त्यामुळे अनेक दुकानांवर धाडी टाकण्याचे कार्य नागपूर महापालिकेच्या वतीने केले जात आहे.

नागरिकांचा कल मातीच्या मूर्तींकडे

पीओपीच्या मूर्ती पाण्यात विरघळत नसल्याने पर्यावरणाची हानी होते आणि मूर्तीचा अवमानही होतो, ही बाब लक्षात घेता अनेक नागरिक घरी मातीच्या गणेश मूर्तीची स्थापना करण्यास प्राधान्य देतात. परंतु, पीओपीच्या मूर्ती किमतीने स्वस्त आणि दिसायला आकर्षक असतात. तसेच विक्रेत्यांना त्यावर माती आणि शाडू मातीच्या मूर्तीच्या तुलनेत अधिक नफा मिळत असल्याने ते पीओपी मूर्ती विक्री करण्यास प्राधान्य देतात.

विविध प्रकारच्या मूर्ती उपलब्ध

मार्केटमध्ये पेशवाई गणपती, लालबाग गणपती, टेकडी गणपती, शिवाजी गणपती, बालरुप मधील गणपती, सिंहासनाधिन गणपती, याप्रमाणे गणपतीची विविध रुपे बघायला मिळत आहे. पीओपीच्या मूर्ती या 300 रुपयांपासून ते 50 हजार रुपये किमती पर्यंत उपलब्ध आहे. तर माती आणि शाडू मातीच्या मूर्ती या 500 रुपयांपासून ते 5000 रुपयांपर्यंत उपलब्ध आहे. यावर्षीच्या गणेशोत्सवामध्ये नागपूर शहरातील संपूर्ण बाजारपेठेची आर्थिक उलाढाल ही 100 कोटी रुपयांपेक्षा अधिक आहे.

सजावटीचे साहित्य 20 टक्क्यांनी महागले

तर गणरायाला सजविण्यासाठी लागणाऱ्या वस्तू जसे की, मखर, एलईडी दिवे, तोरण, कृत्रिम फुले, स्प्रेपेंट, चमकदार झुंबर, विविध प्रकारच्या माळा, प्लास्टीकची शोभेची झाडे आणि वेली, लायटिंग, यासह इतर सजावटीच्या साहित्यात यावर्षी 20 टक्क्यांनी वाढ झालेली असली, तरी मागणीतही वाढ झालेली आहे. तसेच यावर्षी बाजारात विविध प्रकारचे मखर बघायला मिळत आहे. त्यात लाकडी मखर, लाकूड आणि रबर यांचा वापर करुन तयार केलेले विविध डिझाइनचे मखर 600 रुपयांपासुन ते 3 हजार रुपयापर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. गणरायाच्या सजावटीच्या साहित्याची शहरातील एकूण आर्थिक उलाढाल ही 200 कोटी रुपयांच्या जवळपास असण्याची शक्यता आहे.

पूजेच्या साहित्याची मागणी वाढली

बाप्पाच्या आगमनाची चाहूल लागताच मार्केटमध्ये धूप आणि सुगंधित अगरबत्त्यांचा सुगंध दरवळू लागला आहे. गणेश चतुर्थी जसजशी जवळ येत आहे. तसतशी बाजारपेठेत अगरबत्ती, कापूर, धूप, अत्तर, रंगीत दिवे, वाती यांची मागणी जोर धरु लागली आहे. महत्वाचे म्हणजे सहा फूटांची अगरबत्ती बाजारात लोकप्रिय ठरत आहे. 120 रुपये किलो पासुन ते 3500 रुपये किलो किमतीच्या अगरबत्ती बाजारात विक्रीस उपलब्ध आहे. पूजेच्या संपूर्ण साहित्याची शहरातील वार्षिक उलाढाल 1 कोटी रुपयांपेक्षा अधिक असल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.