मागील वर्षभरापासून तेजीत असलेल्या रिअल इस्टेट क्षेत्राला आता गणेश चतुर्थीचे वेध लागले आहेत. गणरायाच्या आगमनाला ग्राहकांकडून घरांचे बुकिंग केले जात असल्याने बड्या बिल्डर्सनी नवीन प्रोजेक्ट्ची घोषणा केली आहे. झीरो स्टॅम्प ड्युटीपासून, जीएसटी माफ, इजी पेमेंट सिस्टमसारख्या ऑफर्स देण्यात आल्या आहेत.
मुंबई आणि उपनगरात नवे हाऊसिंग प्रोजेक्ट् जोरात सुरु आहेत. कोरोनानंतर स्थावर मालमत्ता क्षेत्राला सुगीचे दिवस आले आहेत. नाईटफ्रॅंक इंडिया संस्थेच्या आकडेवारीनुसार वर्ष 2023 मधील जानेवारी ते ऑगस्ट या आठ महिन्यात एकूण 83 हजार 263 मालमत्तांची नोंदणी झाली आहे. यातून सरकारला 7 हजार 242 कोटींचा महसूल मिळाला.
ऑगस्टमधील मालमत्ता नोंदणीत घरांचे प्रमाण जवळपास 80% आहे. यात मालमत्तेची सरासरी किंमत 1 कोटींच्या आसपास होती. 2020 मध्ये हे प्रमाण 48% तर 2023 मध्ये सरासरी 57% इतके होते. हाच ट्रेंड गणेशोत्सवात देखील सुरुच राहण्याची शक्यता आहे.
गणेशोत्सवात ऑफर्सचा भडिमार करुन बांधकाम व्यावसायिकांना शिल्लक घरांचा साठा संपवण्याची संधी असते. त्यानुसार आगाऊ बुकिंगसाठी बिल्डर्सकडून वेगवेगळ्या ऑफर्स देण्यात येत आहेत. यात गोल्ड कॉईन, टू व्हीलर बक्षीस देण्यात येते. काहींनी एलईडी टीव्ही, डबल डोअर रेफ्रिजरेटर, आयफोन सारखे गिफ्ट देण्याची घोषणा केली आहे. डुप्लेक्स आणि लक्झुरी फ्लॅट्स बुकिंगवर चक्क हॅचबॅक कार बक्षीस दिली जात आहे.
यंदाच्या गणेशोत्सवात बिल्डरांनी वेगवेगळ्या ऑफर्स देऊ केल्या असल्याची माहिती जेएलएलचे वरिष्ठ संचालक रितेश मेहता यांनी सांगितले. या ऑफर्समध्ये घराच्या बुकिंगवर झीरो स्टॅम्प ड्युटी, नो जीएसटी, 12 महिन्यांचा ईएमआय माफ, वरच्या मजल्यावरील घरांना प्रीमियम आकारणी नाही अशा ऑफर्स देण्यात आल्या आहेत. याशिवाय महागड्या घरांसाठी ग्राहकांना पेमेंटचे सोपे पर्याय जसे की 25:25:25:25 अशा पटीत रक्कम भरण्याचा पर्याय देखील काही बिल्डर्सनी दिला असल्याचे त्यांनी सांगितले.
मुंबई महानगरात वेगाने नागरीकरण होते आहे. त्यामुळे या ठिकाणी शिल्लक घरांचा साठा देखील बिल्डरांसाठी डोकेदुखीचा विषय बनला. घरांच्या विक्रीला चालना देण्यासाठी बँकांशी भागीदारी करुन 95% पर्यंत गृहकर्ज देण्याच्या ऑफर्स देखील नामवंत बिल्डर्स कडून गणेशोत्सवानिमित्त देण्यात आल्या आहेत. यामुळे ग्राहकांसाठी अनेक चॉईस उपलब्ध आहेत.