देशभरात टोमॅटो, कांदे, हिरव्या पालेभाज्या, डाळी आणि इतर दैनंदिन गरजेच्या वस्तू महाग होत असताना आता त्यात आणखी एका वस्तूची भर पडली आहे ती म्हणजे फळे. गेल्या काही दिवसांपासून रोजच्या आहारातील फळांची आवक बाजारात कमी झाल्यामुळे फळांच्या किंमती वाढल्या आहेत. आधीच पालेभाज्या आणि अन्य वस्तूंच्या महागाईने त्रस्त असलेल्या नागरिकांना अधिक पैसे मोजावे लागत आहेत.
अधिक मास आणि श्रावण
अधिक मास सुरु असताना अनेकांकडे उपवास व धार्मिक विधीचे आयोजन केले जात आहे. या विधींमध्ये आणि उपवासाला फळे लागतात. व्रत-वैकल्यांचा महिना सुरु झाला असताना फळांना देखील मागणी मोठ्या प्रमाणात होत असते, नेमक्या याचवेळी फळे महाग झाल्यामुळे किरकोळ बाजारात फळे खरेदीवर याचा परिणाम दिसू लागला आहे. फळांच्या महागाईचा दर जूनमध्ये 1.3 टक्क्यांनी वाढला आहे, जो मागील महिन्यात म्हणजेच मे महिन्यात 0.5 टक्के इतका होता. ही वाढ दिसायला कमी असली तरी सामान्यांना किलो- दोन किलो फळे खरेदी करतानाही विचार करावा लागतो आहे.
सफरचंद महागले
फळांच्या किंमती महाग होत असतानाच सर्वाधिक भाववाढ ही सफरचंदाच्या बाबतीत झालेली पाहायला मिळते आहे. महाराष्ट्रासह इतर राज्यांमध्ये शिमला, उत्तराखंड, काश्मीरमधून सफरचंद विक्रीसाठी येत असते. मात्र उत्तरेतील राज्यांमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसाचा जोर कमी झाला असला तरी दळणवळणाची साधने पूर्वपदावर आलेली नाहीत आणि शेतीतील फळपिकांचे देखील चांगलेच नुकसान झाले आहे. याशिवाय अमेरिकन सफरचंद देखील बाजारात उपलब्ध असून ते देशी सफरचंदापेक्षा महाग असल्याने त्याला कमी पसंती दिली जाते आहे.
ऑगस्ट महिन्यात किलोमागे सफरचंद 20 रुपयांनी महागले आहे. मागील महिन्यात 160 रुपये किलोने मिळणारे सफरचंद आता 180 रुपये किलो दराने मिळत आहेत. येणाऱ्या काही दिवसांत सफरचंदाच्या किंमती आणखी वाढण्याचा अंदाज आहे.
केळी, पपई, सीताफळ महागले
किरकोळ बाजारात 40 रुपये डझनने मिळणारी केळी आता 50 रुपये डझनने विकली जात आहेत. केळीची आवक देखील कमी झाल्यामुळे नागरिकांना केली खरेदी करताना अधिक पैसे मोजावे लागत आहेत. यासोबतच पपई आणि सीताफळ ही सिजनल फळे देखील चांगलीच महागली आहेत. पपईत नगामागे 10 रुपये अधिक मोजावे लागत आहेत. 1 किलोभर भरणारी पपई 60 रुपये दराने विकली जात आहे. तसेच सीताफळ खरेदीतही डझन 15-20 रुपयांची वाढ झाली आहे.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            