भारतीय शेअर मार्केटला हादरवणाऱ्या हिंडेनबर्ग रिपोर्टच्या तडाख्यातून अदानी ग्रुप सावरला आहे. अदानी ग्रुपच्या शेअर्समध्ये सलग दुसऱ्या सत्रात तेजी आल्याने यातील चार कंपन्यांची मार्केट कॅप 1 लाख कोटींवर गेली.शेअर्समधील तेजीने गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.
सुप्रीम कोर्टाच्या तज्ज्ञ समितीने अदानी समूहातील शेअर्सच्या किंमतीत कोणताही गैरव्यवहार झाला नसल्याचा निर्वाळा दिल्यानंतर अदानी शेअर्समध्ये तेजीची लाट धडकली आहे. आज मंगळवारी सलग दुसऱ्या सत्रात अदानी ग्रुपचे शेअर्स वधारले.
अदानी ग्रुपमधील मोठी कंपनी अदानी एंटरप्राईसेसचे बाजार मूल्य 3.1 लाख कोटींवर गेले. आज मंगळवारी अदानी एंटरप्राईसेसचा शेअर 17% ने वधारला. तो 2736.15 वर बंद झाला.
अदानी पोर्टची मार्केट कॅप आज 1.7 लाख कोटींवर गेली आहे. आज अदानी पोर्टचा शेअर 8% ने वधारला आणि तो 785.95 रुपयांवर स्थिरावला. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी पोर्टच्या शेअर्समध्ये सर्वाधिक घसरण झाली होती. या शेअरचे बाजार मूल्य 1 लाख कोटींनी कमी झाले होते.
अदानी ग्रीन या शेअर्समध्येही आज 5% वाढ झाली आहे. अदानी ग्रीनची मार्केट कॅप 1.56 लाख कोटीपर्यंत वाढली आहे. आजच्या सत्रात अदानी ग्रीनचा शेअर अप्पर सर्किटमध्ये गेला. तो 989.50 रुपयांवर स्थिरावला.
अदानी पॉवरने देखील आज 1 लाख कोटींचा मार्केट कॅपचा टप्पा ओलांडला. आज अदानी पॉवरच्या शेअरमध्ये अप्पर सर्किट लागले. अदानी ग्रुपमध्ये 1 लाख कोटींचा टप्पा ओलांडलणारी ही चौथी कंपनी ठरली. 28 फेब्रुवारी 2023 रोजी अदानी पॉवरची मार्केट कॅप 5100 कोटी इतकी होती.
याशिवाय आज अदानी ट्रान्समिशनचा शेअरला अप्पर सर्किट लागले. अदानी ट्रान्समिशनचा शेअर 866.60 रुपयांवर बंद झाला. अदानी ट्रान्समिशनची मार्केट कॅप 96700 कोटींवर गेली आहे. अदानी टोटल गॅसची मार्केट कॅप 83300 कोटी असून अदानी विल्मरची मार्केट कॅप 63500 कोटी इतकी आहे.