परदेशी प्रवास करण्याचा विचार तुमच्या मनात येणं किंवा परदेश प्रवास करणं हा अनुभव मनाला सुखावणारा असतो. आपण आपल्या देशापेक्षा वेगळ्या ठिकाणी गेलो किंवा तिथल्या संस्कृतीबाबत जाणून घेतलं, पर्यटनाचा आस्वाद घेतला ही मजा काही औरच असते. मात्र परदेश प्रवास तितकाच खर्चिकही असतो. आतातर हा प्रवास आणखीनच महागणार आहे. उद्या म्हणजेच 1 ऑक्टोबर 2023 पासून हाच परदेश प्रवास तुमच्या खिशाला जास्त कात्री लावणार आहे.
1 ऑक्टोबर 2023 पासून तुम्हाला परदेशा जायचं असेल तर तुम्हाला जास्त टीसीएस(TCS) द्यावा लागणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून 7 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या टूर पॅकेजसाठी तुम्हाला 20 टक्के जास्त टीसीएस(TCS) द्यावा लागणार आहे. सरकारने 1 जुलै 2023 ही तारीख याआधी ठरवली होती. मात्र, त्यानंतर तीन महिने यात सवलत देण्यात आली होती. आता मात्र यावर सरकाकडून शिक्कामोर्तब करण्यात आलं आहे.
आधी किती होता टीसीएस?
परदेश प्रवासासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत 7 लाख किंवा त्यापेक्षा जास्त रकमेवर फक्त 5 टक्के टीसीएस लागत होता. 1 ऑक्टोबर 2023 पासून हाच टीसीएस म्हणजेच (टॅक्स कलेक्टेड अॅट सोर्स) वाढणार आहे. 1 ऑक्टोबर 2023 पासून सात लाख किंवा त्यापेक्षा जास्त परदेशी प्रवासाच्या पॅकेजसाठी तुम्हाला 20 टक्के इतका टीसीएस भरावा लागणार आहे.आरबीआयच्या एलआरएस म्हणजेच ‘लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम’ च्या अंतर्गत तुम्हाला एक ऑक्टोबरपासून 20 टक्के टीसीएस द्यावा लागणार आहे.सात लाखापेक्षा कमी रकमेवर मात्र तुम्हाला 5 टक्केच टीसीएस लागणार आहे.
एलआरएस म्हणजे काय?
एलआरएस अर्थात लिबरलाइज्ड रेमिटन्स स्कीम. भारतीय रिझर्व्ह बँकेने सादर केलेली ही एक चौकट आहे ज्याद्वारे भारतीय प्रवशांना परदेशी शिक्षणासाठी, प्रवासासाठी किंवा गुंतकवणुकीसाठी ठराविक रक्कम परदेशात पाठवण्याची परवानगी देतं. एलआरएसची मर्यादा किंवा मार्गदर्शक तत्वं काळाप्रमाणे बदलू शकतात. त्यामुळे अशा प्रकारे कोणतेही पैसे पाठवताना सुधारित नियमावली काय आहे हे पाहाण्याचा सल्ला दिला जातो.