भारतात एप्रिल ते जून या पहिल्या तिमाहीत थेट परकीय गुंतवणुकीत 34% घसरण झाली आहे. आर्थिक वर्षाच्या पहिल्या तीन महिन्यात देशात 10.94 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाल्याचे सरकारने म्हटले आहे. मात्र देशभरात एफडीआयचा ओघ कमी झाला असला तरी महाराष्ट्रात मात्र इतर राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक परकीय गुंतवणूक झाली.
केंद्र सरकारच्या उद्योग आणि अंतर्गत व्यापार प्रोत्साहन विभागाने थेट परकीय गुंतवणुकीची आकडेवारी जाहीर केली. त्यानुसार एप्रिल ते जून 2023 या तिमाहीत भारतात 10.93 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत 16.58 बिलियन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली होती.
आर्थिक वर्ष 2022-23 मधील चौथ्या तिमाहीत अर्थात जानेवारी ते मार्च 2023 या काळात 9.28 बिलियन डॉलर्स थेट परकीय गुंतवणूक झाली होती.
चालू आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत टेलिकॉम, ऑटो, कॉम्प्युटर हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर, फार्मा या क्षेत्रात गुंतवणुकीचा ओघ कमी झाल्याचे सरकारने म्हटले आहे. दुसऱ्या बाजूला जपान, जर्मनी आणि नेदरलॅंड्स या देशांमधून गुंतवणूक वाढली आहे.
सिंगापूर, मॉरिशस, अमेरिका, ब्रिटन, यूएई या देशांमधून गुंतवणूक मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. त्याशिवाय केमन आयलॅंड्स, सायप्रस सारख्या देशांमधून देखील भारतात होणारी गुंतवणूक कमी झाल्याचे दिसून आले. केमन आयलॅंड्समधून गेल्या वर्षी पहिल्या तिमाहीत भारतात 450 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली होती. यंदा केवळ 75 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. सायप्रसमधून यंदा केवळ 6 मिलियन डॉलर्सची गुंतवणूक झाली. गेल्या वर्षी हे प्रमाण 605 मिलियन डॉलर्स इतके होते.
‘FDI’मध्ये महाराष्ट्र अव्वल
परकीय गुंतवणूकदारांसाठी महाराष्ट्र पहिल्या पसंतीचे राज्य ठरले आहेत. एप्रिल ते जून या तिमाहीत देशातील इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक झाली. त्याखालोखाल कर्नाटक, गुजरात आणि दिल्ली या राज्यांमध्ये एफडीआयचा ओघ दिसून आला. त्याआधीच्या जानेवारी ते मार्च 2023 या तिमाहीत एफडीआयच्या बाबत महाराष्ट्र अव्वल होता. भारतात झालेल्या एकूण थेट परकीय गुंतवणुकीपैकी 29% गुंतवणूक महाराष्ट्रात झाली होती. आता सलग दुसऱ्या तिमाहीत महाराष्ट्र एफडीआयच्या बाबत अव्वल राहिला आहे.