ई-कॉमर्समधील आघाडीची कंपनी फ्लिपकार्टने जुन्या बिघडलेले स्मार्टफोन्स आणि साधे मोबाईल यांच्यासाठी एक्सचेंज कार्यक्रम जाहीर केला आहे.ग्राहकांना जुने मोबाईल्स आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणे कंपनीला परत देऊन त्या बदल्यात नवीन प्रोडक्ट्स खरेदी करता येतील, असे फ्लिपकार्टने म्हटले आहे.
टेलीव्हिजन, रेफ्रिजरेटर आणि वॉशिंग मशिन्सपासून ते लॅपटॉप, स्मार्टफोन्स आणि मोबाईल फोन्सपर्यंत सर्व उपकरणे एक्सचेंज करता येणार आहेत. कोठूनही खरेदी केलेली वापरलेली आणि बिघडलेली इलेक्ट्रॉनिक व अवजड उपकरणे परत करुन त्या बदल्यात ग्राहक नवीन उपकरणे घेऊ शकतात. एक्सचेंज प्रोग्रॅममध्ये ग्राहकांना आकर्षक बायबॅक ऑफर्सचा लाभ घेता येईल.
कंपनीकडून बंद असलेली उपकरणे घरी येऊन संकलित केली जाणार आहेत. त्याशिवाय नूतनीकरणापूर्वी किंवा जबाबदार पद्धतीने विल्हेवाट लावण्यापूर्वी मोबाइल फोन, स्मार्टफोन्स व फीचर फोन्स व लॅपटॉपमधील डेटा काढून टाकण्यासाठी आवश्यक ती पावले उचलली जातील, असे कंपनीने म्हटले आहे.
खराब झालेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांची विल्हेवाट लावणे अनेकांसाठी डोकेदुखी ठरते. यावर मात करण्याच्या दृष्टीने एक्सचेंज प्रोग्रॅम आखण्यात आला आहे. निष्क्रिय उपकरणांची विक्री करण्यासाठी किंवा त्या बदल्यात नवीन उपकरण खरेदी करण्यासाठी विक्रेता शोधणे, अवजड उपकरणांच्या डिलिव्हरीची व्यवस्था करणे ही त्रासदायक कामे फ्लिपकार्टच्या एक्सचेंज कार्यक्रमामुळे ग्राहकांना करावी लागणार नाहीत, असे कंपनीने म्हटले आहे.
जुन्या वस्तूंचे एक्सचेंज मूल्यही मिळणार आहे. त्या मूल्याचा उपयोग करून नवीन उत्पादन खरेदी केले जाऊ शकते असे फ्लिपकार्टने म्हटले आहे. खराब झालेल्या उत्पादनातून पैसा मिळवून देणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्दिष्ट, अयोग्य विल्हेवाटीतून निर्माण होणारा इलेक्ट्रॉनिक कचरा (E-Waste) कमी करणे हा आहे.
ई-कचऱ्याची विल्हेवाट जबाबदार पद्धतीने लावण्यासाठी फ्लिपकार्टने अधिकृत व्हेंडर्ससोबत सहयोग केला आहे. निष्क्रिय उत्पादनाच्या अवस्थेनुसार, त्याचे नूतनीकरण, रिसायकलिंग केले जाईल किंवा अधिकृत व्हेंडर्सद्वारे जबाबदार पद्धतीने त्याची विल्हेवाट लावली जाईल.
ई-कचरा निर्माण होणाऱ्या देशांमध्ये भारत तिसऱ्या क्रमांकावर आहे. वर्ष 2019 मध्ये भारतात 32 लाख टन ई-कचरा तयार झाला होता. मात्र त्यातील केवळ 10% कचरा रिसायकलिंगसाठी संकलित केला जातो. त्यामुळे ई-कचऱ्याच्या विल्हेवाटीबाबत अधिक व्यापक दृष्टिकोनातून बघण्याची आवश्यकता आहे, असे मत फ्लिपकार्टच्या रि-कॉमर्सचे व्यवसाय प्रमुख आणि वरिष्ठ संचालक आशुतोष सिंह चंदेल यांनी सांगितले.
बंद पडलेल्या इलेक्ट्रॉनिक्स उपकरणांसाठी एक्सचेंज कार्यक्रम आणल्याने ग्राहकांना वापरात नसलेली इलेक्ट्रॉनिक व अवजड उत्पादने मोडीत काढण्यासाठी, नाविन्यपूर्ण, शाश्वत व सोयीस्कर उपाय सुचवण्यात आला आहे. त्यांना मोबदल्यात हवे ते नवीन उत्पादन खरेदी करता येईल. हा कार्यक्रम अर्थव्यवस्थेकडील स्थित्यंतरात आणि पर्यावरणावरील परिणाम कमी करण्यात संप्रेरकाची भूमिकाही बजावेल, असे त्यांनी सांगितले.