• 08 Jun, 2023 00:47

Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Fake QR Code for Donation: श्रद्धाळू भाविकांची फेक क्यूआर कोडच्या माध्यमातून आर्थिक फसवणूक

Fake QR Codes for Donation

Fake QR Code for Donation: बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर परिसरात काही भामट्यांकडून डिजिटल मोडमध्ये दान स्वीकारण्यासाठी क्यूआर कोड लावण्यात आल्याचे दिसून आले. पण हे क्यूआर कोड मंदिर देवस्थान समितीने लावले नसल्याचे समितीचे म्हणणे आहे.

Fake QR Code for Donation: भारतात देवळांची आणि त्या देवळांत तेवढ्याच श्रद्धेने जाणाऱ्या भाविकांची कमी नाही.हे भाविक मोठ्या श्रद्धेने या देवळांमध्ये दानधर्म करत असतात. या भाविकांच्या सोयीसाठी आता काही मंदिरांमध्ये क्यूआरकोडच्या माध्यमातून दान करण्याची सोय बसवण्यात आली आहे. पण या क्यूआर कोडच्या माध्यमातून भाविकांची फसवणूक होऊ लागली आहे.

काही दिवसांपूर्वीच बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर परिसरात काही भामट्यांनी भाविकांकडून डिजिटल रुपात पैशांचे दान घेण्यासाठी क्यूआर कोडचे स्टिकर लावल्याचे दिसून आले. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे हे क्यूआर कोड मंदिर देवस्थान समितीने लावले नव्हते. याबाबत मंदिर समितीने पोलिसांत तक्रार दाखल करून याची चौकशी करण्याची मागणी केली. सध्या डिजिटलचा जमाना असल्याने बरेच भाविक फिरण्यासाठी जाताना किंवा धार्मिक पर्यटन करताना रोख रखमेचा कमीतकमी वापर करतात. सर्वत्र डिजिटल पेमेंटची सोय उपलब्ध असल्याने बरेच जण रोख रक्कम सोबत ठेवणे टाळू लागले आहेत.पण याचा काही भामटे चुकीचा वापर करत लोकांची आर्थिक फसवणूक करू लागले आहेत.

बद्रिनाथ-केदारनाथ मंदिर परिसरात लावण्यात आलेल्या क्यूआर कोड विरोधात मंदिर देवस्थान समितीचे अध्यक्ष अजेंद्र अजय यांनी पोलिसांत तक्रार दाखल केली. हे क्यूआर कोड विशेष करून मंदिराचे दरवाजे उघडले गेले त्या दिवशी लावल्याचे त्यांनी सांगितले. म्हणजेच ज्या दिवशी मंदिर परिसरात बरेच भाविक आले होते. त्यावेळी काही भामट्यांनी मंदिरातील दानधर्माच्या नावावर लोकांची आर्थिक फसवणूक करण्याचा प्रयत्न केला गेला.

महाराष्ट्रातील शिर्डीचे साईबाबा देवस्थान, दादरमधील सिद्धिविनायक मंदिर, तामिळनाडूमधील तिरुपती देवस्थान असो किंवा लालबागचा राजा असो, या ठिकाणी श्रद्धाळू भाविक सढळहाताने पैसे, दागदागिने, सोन्या-चांदीच्या वस्तू, परदेशातील नोटा असे जे काही दान करणे शक्य आहे. ते दान करतात. तिरुपती येथे तर भाविक डोक्यावरचे केसही दान करतात. पण अशा श्रद्धाळू भाविकांची फसवणूक करणारे ठगही आपल्याकडे भरपूर आहेत. त्यामुळे भाविकांनी अशा फसवणुकीपासून सावध राहणे गरजेचे आहे. क्यूआर कोडद्वारे दुसऱ्यांना पैसे पाठवण्यापूर्वी ते खाते कोणाच्या नावावर आहे. याची खातरजमा केली पाहिजे. खरंच मंदिर देवस्थान समितीने दानधर्मासाठी क्यूआर कोड लावले असतील, तर ते स्कॅन करण्यापूर्वी देवस्थान समितीकडून त्याची संपूर्ण माहिती घ्यावी आणि मगच पैसे ट्रान्सफर करावे. तसेच धार्मिक ठिकाणी पैसे ट्रान्सफर केल्यानंतर त्याची रितसर पावती घ्यावी. 

डिजिटल साक्षर असणे गरजेचे

तंत्रज्ञानामुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या असल्या तरी त्यामुळे काही संकटेही येऊ लागली आहेत. डिजिटल पेमेंटच्या सोयीमुळे रोख रक्कम बाळगण्याची चिंता मिटली. पण डिजिटल पेमेंटचा योग्य पद्धतीने वापर केला गेला नाही तर मोठे आर्थिक नुकसान होऊ शकते. यासाठी डिजिटल साक्षर असणे खूप गरजेचे आहे. क्यूआर कोडच्या माध्यमातून पैसे पाठवणे सोपे असले तरी, ते पैसे कोणाला जात आहेत. याची माहिती असणे गरजेचे आहे. अन्यथा पैसे चुकीच्या खात्यांमध्ये जमा होऊ शकतात.  

डिजिटल साक्षरता म्हणजे काय?

डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक असलेली कौशल्ये विकसित करणे. तुम्ही जर स्मार्टफोन वापरत असाल तर तो हाताळायचा कसा. तो हाताळताना कोणतीही चूक होणार नाही किंवा त्यामुळे तुमची गोपनीय माहिती इतरांपर्यंत पोहोचणार नाही. याची काळजी घेणे म्हणजे डिजिटल साक्षर असणे.

ऑनलाईन पैसे ट्रान्सफर करताना अशी काळजी घ्या

  • फ्री वाय-फाय वापरणे टाळावे
  • स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम नेहमी अपडेट करत राहा
  • मोबाईलचे आणि त्यातील अ‍ॅपचे पासवर्ड सातत्याने बदलत रहा.
  • इतरांच्या गॅझेटवरून ऑनलाईन बँकिंगचे व्यवहार टाळावे
  • स्वत:चे बँक खाते, डेबिट/क्रेडिट कार्ड क्रमांक आणि पिन कोणालाही सांगू नका