Festival Season: भारतातील ऑटो सेक्टरमधील काही कंपन्यांनी आगामी सणासुदींच्या पार्श्वभूमीवर मोठी जय्यत तयारी केली आहे. गणपती, दसरा, दिवाळी या सणांच्या निमित्ताने गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्री होते. हीच गोष्ट हेरून ऑटो कंपन्यांनी कार सेल्सचे मोठे टार्गेट सेट केले आहे. तर ट्रेडिंगच्या माध्यमातून गुंतवणूकदारांनी आपला मोर्चा ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या शेअर्सकडे वळवल्याचे दिसून येते.
ऑटो सेक्टरमधील बहुतांश कंपन्यांचे पहिल्या तिमाहीचे अहवाल प्रसिद्ध झाले आहेत. या अहवालातून कंपन्यांना चांगला नफा झाल्याचेही दिसून येते. कंपन्यांबरोबरच या कंपन्यांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या शेअर्स खरेदीदारांनाही फायदा झाला आहे. या अहवालांच्या पार्श्वभूमीवर मारुती कंपनीने आगामी सण लक्षात घेऊन 10 लाख गाड्यांची विक्री करण्याचा मानस व्यक्त केला आहे. त्यामुळे आपोआपच ऑटो सेक्टरमध्ये ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांच्या नजरा उंचावल्या आहेत.
शेअर मार्केटमधील खेळ हा बातम्या, अहवाल, फ्युचर प्लॅन यावर सुरू असतो. त्यामुळे एखाद्या सेक्टरशी संबंधित बातमी आली की, त्या सेक्टरच्या शेअर्सवर गुंतवणूकदारांच्या नजरा खिळून राहतात. सध्या ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या प्लॅनला धरून अनेकांनी ऑटो कंपन्यांचे शेअर्स वॉचलिस्टमध्ये लावल्याचे, शेअर मार्केटमधील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
ऑटो सेक्टरसाठी पोषक वातावरण
ऑटो सेक्टरमधील कंपन्यांच्या तिमाही अहवालात कंपन्यांनी चांगला परफॉर्मन्स केल्याचे दिसून येते. त्यामुळे कंपन्यांनी आगामी सणसुदीचे दिवस लक्षात घेऊन त्याचा फायदा उचलण्याची तयारी केली आहे. त्यात आरबीआयने सलग तिसऱ्यांदा रेपो दर जैसे थे ठेवल्यामुळे काही बँकांनी आपले रेटसुद्धा तसेच ठेवल्याचे दिसून येते. त्यामुळे ग्राहकांकडून सणासुदीच्या काळात चांगली खरेदी होऊ शकते, अशी ऑटो कंपन्या आणि कर्ज देणाऱ्या बँकांना आशा आहे.
गुंतवणूदारांची कंपन्यांच्या शेअर्सवर नजर
ऑटो कंपन्यांनी आपले सेल्सचे फ्युचर्स प्लॅन जाहीर केल्यानंतर ट्रेडिंग करणाऱ्या गुंतवणूकदारांनीही ऑटो कंपन्यांच्या शेअर्समध्ये होणाऱ्या वाढीचे टार्गेस फिक्स केले आहेत. यामध्ये भारत फोर्ज, मारुती, महिन्द्रा अॅण्ड महिन्द्रा या कंपन्यांच्या शेअर्सवर विशेष नजर असल्याचे दिसून येते.