अमेरिकेची केंद्रीय बँक असलेल्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीला विराम देण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर महिन्यातील आकडेवारीनुसार अमेरिकेतील महागाई कमी झाली आहे. महागाई आटोक्यात आणण्यासाठी मागील काही महिने फेडरल रिझर्व्हने प्रमुख व्याजदरात वाढ केली होती. यामुळे जगभरातील शेअर मार्केटमध्ये प्रचंड घसरण दिसून आली. नुकताच पार पडलेल्या बैठकीत फेडरल रिझर्व्हकडून व्याजदर वाढीचा कार्यक्रम सौम्य करण्याचे संकेत दिले होते. यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला होता.
फेडरलच्या व्याजदर वाढीनंतर वस्तूंची मागणी कमी झाली आहेत. कर्ज महागल्याने ग्राहकांची क्रयशक्ती कमी झाल्याने किंमत नियंत्रणामध्ये व्याजदर वाढ प्रभावी ठरली आहे. त्यामुळे नुकताच पार पडलेल्या मिटिंगमध्ये फेडरल रिझर्व्हने व्याजदरात कोणताही बदल केला नाही.
फेडरल रिझर्व्हचा व्याजदर 4.5% इतका आहे. येत्या 1 फेब्रुवारी 2023 रोजी बँकेची बैठक होणार आहे. त्यात बँक व्याजर वाढवण्याची शक्यता कमी असल्याचे जाणकारांनी म्हटले आहे. सलग चार बैठकांमध्ये व्याजदरात प्रत्येकी 0.75% वाढ केल्यानंतर फेडरल रिझर्व्हच्या धोरणांवर टीका करण्यात आली होती. मात्र आता बँक किती टक्के व्याजदर वाढवणार याकडे जाणकारांचे लक्ष लागले आहे.
अमेरिकेतील बेरोजगारी पाच दशकांतील नीचांकी पातळीवर आहे. महागाई दर देखील कमी होत आहे. त्यामुळे बँकेकडून व्याजदर वाढीचा कार्यक्रम आटोपता घेण्याची किंवा त्याचा वेग सौम्य करण्याची शक्यता आहे. येत्या 1 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या बैठकीत बँकेकडून व्याजदरात 0.25% वाढ केली जाईल, अशी शक्यता आहे. तर काही जाणकारांच्या मते बँक आगामी पतधोरणात व्याजदर 0.5% ने वाढवून तो 5% करण्याची शक्यता आहे. अमेरिकेतील महागाईल दर 2% पर्यंत मर्यादित ठेवण्याचे फेडरल रिझर्व्हचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे व्याजदर वाढीचे सत्र सुरुच राहील असाही अंदाज काहीजण व्यक्त करत आहेत.