ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींवरील व्याजदराचे ऑगस्टमधील नवीन दर बऱ्याच बँकांनी जाहीर केले आहेत. काही बँका ज्येष्ठ नागरिकांना मुदत ठेवींच्या गुंतवणुकीवर 9.1 टक्के व्याज देत आहे.
रिझर्व्ह बँकेने मागील वर्षभरात रेपो दरामध्ये सातत्याने वाढ केली होती. त्यामुळे अनेक बँकांनी मुदत ठेवीच्या व्याजदरात वाढ करून गुंतवणूकदारांना चांगले रिटर्न देण्याचा प्रयत्न करत आहेत. आजही अनेक बँका सर्वसाधारण नागरिकांसह ज्येष्ठ नागरिकांना एफडीवर (Fixed Deposit) चांगले व्याजदर देत आहे.
सुर्योदय स्मॉल फायनान्स बँक (Suryoday Small Finance Bank-SSFB) 2 वर्षांपेक्षा जास्त आणि 3 वर्षांपेक्षा कमी कालावधीच्या मुदत ठेवींवर 9.10 टक्के व्याज देत आहे. सुर्योदय बँकेने सोमवारी (दि. 7 ऑगस्ट) प्रसिद्ध केलेल्या नवीन व्याजदरानुसार बँकेने ज्येष्ठ नागरिकांच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात वाढ केली. बँकेने 5 वर्षांच्या कालावधीवरील व्याजदरात 85 बेसिस पॉईंटने वाढ केली.
सुर्योदय बँकेने या नवीन प्रसिद्धीपत्रकानुसार, 2 कोटी रुपयांपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवी 7 दिवस ते 10 वर्षांच्या कालावधीसाठी देण्याचा निर्णय घेतला आहे. यात सर्वसाधारण ग्राहकांना 4 ते 8.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर ज्येष्ठ नागरिकांना 4.50 टक्क्यांपासून 9.10 टक्क्यांपर्यंत व्याजदर दिले जात आहे. त्याचबरोबर नियमित ग्राहकांना 2 ते 3 वर्षांच्या ठेवींवर 8.60 टक्के व्याजदर दिला जात आहे. तर याच कालावधीसाठी ज्येष्ठ नागरिकांना 9.10 टक्के व्याज दिला जात आहे.
सुर्योदय बँकेचे नवीन व्याजदर
सुर्योदय बँकेने 2 कोटींपेक्षा कमी किमतीच्या मुदत ठेवींच्या व्याजदरात सोमवारापासून पुढीलप्रमाणे बदल केले आहेत.
7 ते 14 दिवसांसाठी सर्वसाधारण ग्राहकांना बँक या कालावधीसाठी 4 टक्के तर ज्येष्ठ नागरिकांना 4.5 टक्के व्याजदर देत आहे. तर 15 ते 45 दिवसांसाठी सर्वसाधारण ग्राहक आणि ज्येष्ठ नागरिकांना अनुक्रमे 4.25 ते 4.75 टक्के व्याज दिले जाणार आहे.
त्याचबरोबर बँक 1 वर्षासाठी सर्वसाधारण ग्राहकांना 6.85 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.35 टक्के व्याजदर दिला जाणार आहे. तर 2 ते 3 वर्षांसाठी बँक नियमित ग्राहकांना 8.6 टक्के ज्येष्ठ नागरिकांना 9.1 टक्के व्याजदर दिला जात आहे.
5 वर्षांसाठी बँक नियमित ग्राहकांना 8.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 8.75 टक्के व्याजदर देत आहे. तर 5 वर्षांपेक्षा जास्त आणि 10 वर्षांपर्यंतच्या मुदत ठेवींवर सर्वसाधारण ग्राहकांना 7.25 टक्के आणि ज्येष्ठ नागरिकांना 7.75 टक्के व्याजदर दिला जाणार आहे.