Coaching Factory: इंजिनिअरिंग, जेईई, आयआयएम किंवा आयआयटीमध्ये इंटरेस्ट असेल तर, राजस्थानमधील कोटाबद्दल तुम्हाला नक्कीच माहित असेल. गेल्या 10 ते 15 वर्षांत कोटा हे कोचिंग फॅक्टरी म्हणून उदयास आलेल्या शहरात आज कोट्यवधींची उलाढाल सुरू आहे.
आयआयटी आणि आयआयएमच्या (IIT & IIM) आकर्षणामुळे देशात काही नवीन हबस् उदयास येत आहेत. यात दरवर्षी हजारोंच्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत आहेत. ही संख्या आता इतकी वाढली आहे की, यातून कोचिंग क्लासेसची एक वेगळी इंडस्ट्री निर्माण झाली आहे. या इंडस्ट्रीतून सध्याच्या घडीला कोट्यवधी रुपयांची उलाढाल होत आहे. तर सरकारला या इंडस्ट्रीतून दरवर्षी टॅक्समधून 700 कोटी रुपयांचा महसूल मिळत आहे.
आज आपण राजस्थानमधील कोटा या शहरातील कोचिंग क्लासेसमधून होणाऱ्या आर्थिक उलाढालीची माहिती घेणार आहोत. कोटा हे तसे पाहायला गेलं तर 2 किंवा 3 टिअर सिटीमध्ये मोडणारं शहर आहे. पण या शहरातून सध्या सर्वाधिक आर्थिक उलाढाल होत आहे. याचं कारण म्हणजे देशभरातील विद्यार्थी आयआयटी-जेईईची तयारी करण्यासाठी कोटमध्ये येतात. या विद्यार्थ्यांच्या मते, IIT-JEE क्रॅक करण्यासाठी कोटाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे हजारो विद्यार्थी कोट्यवधी रुपये खर्च करून कोटामधील खाजगी क्लासेसमधून कोचिंग घेत आहेत.
वर्षभरात 1.8 लाख विद्यार्थ्यांचा कोटामध्ये प्रवेश
कोटामध्ये साधारणत: जुलै ते जानेवारी या कालावधीत विद्यार्थ्यांची संख्या मोठी असते. जवळपास 1.8 लाख विद्यार्थी इथल्या क्लासेसमधून प्रशिक्षण घेत असतात. कोटा शहराची संख्या 14.7 लाखाच्या घरात आहे; यामध्ये दरवर्षी बाहेरून 12 टक्के विद्यार्थी येतात. प्रामुख्याने उत्तर प्रदेश, बिहार, हरयाणा, पंजाब, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, गुजरात, पश्चित बंगाल आणि ओडिशा या राज्यातून विद्यार्थी मोठ्या प्रमाणात येतात. विद्यार्थ्यांच्या इतक्या मोठ्या संख्येमुळे कोटा शहराची अर्थव्यवस्था विद्यार्थी केंद्रीत झाली आहे. बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी, खाण्या-पिण्यासाठी एक वेगळी यंत्रणा उभी राहिली आहे.
कोटा कोचिंगमुळे 100 कोटींची ट्रॅव्हल इंडस्ट्री उभी
कोटामध्ये नोंदणी असलेले जवळपास 2500 हॉटेल्स आहेत. या हॉटेल्समधून दरवर्षी 1.2 लाख विद्यार्थी राहतात. राहण्यासाठी आणि खाण्यासाठी ते 7 हजारापासून ते 30 हजारापर्यंत पैसे खर्च करतात. कोटामध्ये फ्लॅट आणि स्टुडिओ अपार्टमेंटला मोठी मागणी असते. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांचे पालक इथे वर्षभर ठाण मांडून बसलेले असतात. दरवर्षी विद्यार्थ्यांची संख्या वाढतच आहे. त्याचबरोबर त्यांच्यासोबत येणाऱ्या पालकांमुळेही इथल्या ट्रॅव्हल इंडस्ट्रीत अंदाजे 100 कोटींची वाढ झाली.
हॉटेल्स, ट्रान्सपोर्ट,पुस्तक विक्री जोरात...
कोटामधील विद्यार्थ्यांची वाढती संख्या पाहता इथे स्ट्रीट फूडपासून मोठमोठ्या साखळी हॉटेल्सची आऊटलेट आहेत. त्याचबरोबर शहरात फिरण्यासाठी पब्लिक ट्रान्सपोर्टबरोबर ऑटो, टॅक्सी, प्रायव्हेट बसेस यांचा बिझनेसही जोरात चालतो. शहरात सतत विद्यार्थ्यांचा राबता असल्याने इथे पुस्तक विक्रेत्यांची आणि खरेदीदारांचीही कमी नाही. यातून दरवर्षी 50 ते 60 कोटी रुपयांची पुस्तके विकली जातात.
कोटामधील या कोचिंग फॅक्टरीमुळे वर्षाला 5 हजार कोटींची इंडस्ट्री उभारली जात आहे. यात दिवसेंदिवस वाढ होत आहे. इथे 6 ते 7 मोठे कोचिंग क्लासेस आहेत. ज्यांचे देशभरात नाव आहे. या प्रत्येक क्लासेसमधून 5 हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. त्यांना शिकवण्यासाठी देशभरातील शिक्षक, प्राध्यापक करोडो रुपयांची पॅकेज घेऊन इथे येतात. काही फेमस शिक्षक तर वर्षाला या कोचिंगमधून कोटी रुपये पगार म्हणून घेतात. प्रत्येक विद्यार्थ्याची एका वर्षाची फी 50 हजारांपासून 1.50 लाखाच्या घरात आहे. यावरून कोटामधील कोचिंग फॅक्टरीचा तुम्हाला अंदाज आला असेलच.
Source: www.timesofindia.indiatimes.com