Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

गुंतवणूकदारांचे 9 लाख कोटी मातीमोल! शेअर मार्केटमध्ये पडझड होण्यामागील कारणे माहिती आहेत का?

share market crash

अमेरिकेतील भाववाढ, कंपन्यांचे Q3 मध्ये घटलेले उत्पन्न, फेडरल बँकेकडून दरवाढीचा शक्यता यासह अनेक घटक शेअर बाजारातील पडझडीसाठी जबाबदार आहेत. कमकुवत मान्सून आणि उष्णतेच्या लाटेमुळेही 2023 वर्षात कृषी उत्पन्न घटू शकते. वाचा शेअर बाजारातील अस्थिरतेमागे आणखी कोणती कारणे आहेत.

शेअर बाजारात मागील सात दिवसांत गुंतवणूकदारांचे 9.25 लाख कोटींचे नुकसान झाले. आज सोमवारी सेन्सेक्स निर्देशांक 175 अंकांनी खाली आला. या सात दिवसांत हेडलाइन इंडेक्स 2031 अंकांनी खाली आला. निफ्टी 50 इंडेक्समध्ये सलग सातही दिवस विक्रीचा कल दिसून आला. मात्र, तोटा थोडासा कमी झाल्यानंतर 17392 अंकांवर येऊन थांबला.

मुंबई शेअर बाजारामध्ये सूचीबद्ध कंपन्यांचे एकूण बाजारभांडवल 258 कोटींनी खाली आले. आयटी, मेटल आणि मीडिया हे क्षेत्रीय निर्देशांक 2-4% खाली आले. Realty स्टॉकमध्ये 2% वाढ दिसून आली. हिंडेनबर्ग रिपोर्टनंतर अदानी समूहाचे दहाही शेअर्स खाली आले आहेत. शेअर बाजारातील पडझडीमागे आंतरराष्ट्रीय स्तरावरील परिस्थितीही काही प्रमाणात कारणीभूत आहे. अमेरिकेतील फेडरल बँकेकडून व्याजदर वाढ होऊ शकते, त्यामुळे परदेशी गुंतवणूकदारही भारतीय बाजारातून पैसे काढून घेत आहेत.

शेअर बाजार खाली येण्यामागील काही कारणे

जागतिक बाजारपेठ  - (Gobal market Situation)

जागतिक बाजारातील घडामोडींचा परिणाम भारतीय बाजारावर दिसून येत आहे. अमेरिकेतील शेअर बाजाराचा डाऊ जोन्स निर्देशांक सलग चौथ्या आठवड्यात घसरला. मागील आठवड्यात हा निर्देशांक 3% खाली आला. आशियाई बाजारही दबावाखाली दिसून आला. Nikkei निर्देशांक 0.11% खाली आला तर Hang Seng निर्देशांक 0.33% खाली आला. S&P/ASX 200 1.12% अंकांनी खाली आला आहे.

फेडरल बँकेच्या दरवाढीची भीती (Fed Fear on rate hike)

अमेरिकेमध्ये महागाई आणखी वाढण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. फेडरल बँकेच्या पुढील तीन बैठकांमध्ये बँक व्याजदर वाढवू शकते, अशी भीती गुंतवणूकदारांमध्ये निर्माण झाली आहे. मात्र, ग्राहकांचे उत्पन्न आणि खर्च करण्याची क्षमता अद्यापही चांगली आहे. मागील एक वर्षापासून व्याजदर वाढीच्या भीतीमुळे बाजारामध्ये अस्थिरता निर्माण झाली आहे.

अमेरिकेतील भाववाढीचा डेटा - (US data on inflation)

अमेरिकेचा भाववाढ निर्देशांक PCE डिसेंबर महिन्यात 0.2% वाढला होता. तर जानेवारी महिन्यात 0.6% इतकी वाढ झाली. दरम्यान जानेवारी महिन्यात नागरिकांकडून पैसाही मोठ्या प्रमाणावर खर्च झाला. -0.1% वरुन +1.8% खर्चाचे प्रमाण वाढले. त्यामुळे महागाई कमी करण्यासाठी फेड कडून दरवाढीचे हत्यार उगारले जाऊ शकते, अशी भावना बाजारातून व्यक्त केली जात आहे.

परदेशी संस्थांची घटती गुंतवणूक- FII selling

जानेवारी 2023 पासून परदेशी संस्थांत्मक गुंतवणूकदारांनी 31 हजार कोटींची गुंतवणूक भारतीय शेअर मार्केटमधून काढून घेतली. मागील महिन्यात अमेरिकन बाँडमधून मिळणारे उत्पन्न वाढले आहे. व्याजदर वाढीमुळे गुंतवणूकदारांना अमेरिकेतील शेअर बाजारातून चांगला नफा मिळत आहे. त्यामुळे विकसनशील बाजारातून पैसे काढून घेण्यावर संस्थात्मक गुंतवणूकदारांचा भर आहे. अल्प काळासाठी गुंतवणूक करणाऱ्या परदेशी गुंतवणूकदारांनी पैसे काढून घेण्यास सुरुवात केली आहे.

तिसऱ्या तिमाहीतील उत्पन्न (Q3 earnings)

Nifty 50 निर्देशांकातील कंपन्यांचे ऑक्टोबर-डिसेंबर या तिमाहीचे निकाल हाती आले. मात्र, या निकालाने गुंतवणूकदारांची निराशा केली. 40% कंपन्यांनी निर्धारित केलेले उत्पन्न मिळवले नाही. त्यामुळे कंपनीचे मूल्य आणि नफा यामध्ये मोठी तफावत गुंतवणूकदारांना दिसू लागली. त्यामुळेही बाजारात अस्थिरता दिसून येत आहे.

अदानी स्टॉक्स - (Adani stock crash)

हिंडेनबर्ग रिपोर्ट जाहीर झाल्यानंतर अदानी समूहातील कंपन्यांचे समभाग विक्री करण्याचे प्रमाण गुंतवणूकदारांकडून वाढले आहे. आज दिवसभरात अदानी समूह कंपन्यांतील दहापैकी नऊ कंपन्यांचे शेअर्स लाल रेषेखाली ट्रेड करत होते. अदानी स्टॉक्सचे एकूण मूल्य 7 लाख कोटींनी कमी झाले आहे. अदानी समूहातील कंपन्यांनी स्टॉक्सच्या किंमतीत आणि अकाउंटिंगमध्ये घोटाळा केल्याचा आरोप हिंडेनबर्गने केला होता.

बाँडमधील उत्पन्न (Bond yields)

अमेरिकन ट्रेजरीकडून दिले जाणारे 2 वर्षांच्या बाँडमधून उत्पन्न वाढत आहे. वाढत्या व्याजदरासोबत बाँडमधून मिळणारे उत्पन्न देखील वाढते. बाँडमधून मिळणारे उत्पन्न मागील तीन महिन्यांच्या उच्चांकीवर पोहचले आहे. 4.840% च्या वर बाँडमधून मिळणारे उत्पन्न वाढल्याने अमेरिकन बाँडमध्ये पैसे गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदार उत्सुक आहेत.

एल-निनो इफेक्ट - (El Neno effect on Indian agriculture)

चालू वर्ष शेतीसाठी चांगले नसेल, अशी शक्यता एल-निनो या वातावरणीय परिस्थितीतून दिसून येत आहे. रब्बी हंगामाच्या शेवटी म्हणजे मार्च महिन्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्याचा परिणाम शेती तसेच ग्रामीण भागातील उत्पन्नावर होऊ शकतो. एल निनोमुळे मान्सून पाऊसही पुरेसा होणार नसल्याचे अंदाज वर्तवले जात आहेत. कृषी उत्पन्न घटल्यास भाववाढीची शक्यता वर्तवली जात आहे.