जगातील दुसरे श्रीमंत उद्योजक असलेल्या एलन मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. गुरुवारी 10 मे 2023 रोजी मस्क यांनी राजीनाम्याची घोषणा केली. येत्या सहा आठवड्यात ट्विटरला नवीन सीईओ रुजू होईल, असे म्हटले आहे. आपला उत्तराधिकारी कोण याबाबत मात्र मस्क यांनी नाव उघड केलेले नाही. गेल्या वर्षी मस्क यांनी ट्विटरला 44 बिलियन डॉलर्समध्ये खरेदी केले होते.त्यानंतर स्वत: कंपनीची सूत्रे हाती घेत तत्कालीन सीईओ पराग अगरवालसह वरिष्ठ व्यवस्थापनाची हकालपट्टी केली होती.
ट्विटरला अखेर नवीन सीईओ पदाचा उमेदवार सापडला असल्याचे एलन मस्क यांनी म्हटले आहे. मागील सहा महिन्यांपासून सीईओची निवड प्रक्रिया सुरु होती. आता योग्य उमेदवार सापडला असल्याचा दावा मस्क यांनी केला आहे. येत्या सहा आठवड्यात ट्विटरला नवीन सीईओ मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. मस्क यांनी नव्या सीईओचे नाव जाहीर केले नसले तर ट्विटरची टॉप बॉस महिला असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दरम्यान मस्क यांनी ट्विट करुन राजीनाम्याची घोषणा केली. वॉल स्ट्रीटवर शेअर मार्केट बंद होण्याच्या 15 मिनिटे आधी ही घोषणा झाल्याने त्याचे पडसाद टेस्लाच्या शेअरवर उमटले. टेस्लाचा शेअर 2% ने वधारला.
ट्विटरला खरेदी केल्यापासून एलन मस्क कायम चर्चेत राहिले आहेत. ट्विटरचा करार पूर्ण केल्यानंतर लगेचच मस्क यांनी ट्विटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी पराग अग्रवाल (Parag Agrawal, CEO)आणि लीगल अधिकारी विजया गाड्डे (Vijaya Gadde, Legal Officer) आणि सीएफओ नीड सेगल याच्यासह काही वरिष्ठ अधिकाऱ्यांना बाहेरचा रस्ता दाखवला होता.मागील सहा महिन्यात ट्विटरला आर्थिक शिस्त लावण्यासाठी मस्क यांनी अनावश्यक मनुष्यबळ कमी करण्याचा धडाका लावला होता. ऑक्टोबर 2022 पासून निम्म्याहून अधिक कायमस्वरुपी आणि कंत्राटी कर्मचाऱ्यांची गच्छंती केली आहे.आजच्या घडीला ट्विटरचे जगभरात जवळपास 2300 कर्मचारी आहेत. मस्क यांनी ट्विटरवर ताबा मिळवण्यापूर्वी ट्विटरकडे 7500 कर्मचाऱ्यांचा ताफा होता.
ट्विटरवर ताबा मिळवल्याच्या पहिल्या दिवसापासून आपण कायमस्वरुपी नेतृत्व करण्यास इच्छुक नसल्याचे मस्क यांनी वारंवार सांगितले होते.याबाबत त्यांनी जनमत देखील आजमावले होते. ज्यात लाखो ट्विटर युजर्सनी मस्क यांना सीईओ पदावरुन पायउतार व्हावे, असा कौल दिला होता. जनमत चाचणीत 57% युजर्सनी मस्क यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. मस्क यांनी ट्विटरच्या सीईओ पदाचा राजीनामा दिला आहे. मस्क यापुढे ट्विटरचे चेअरमन आणि चिफ टेक्नॉलॉजी ऑफिसर या नात्याने कंपनीतील प्रॉडक्ट आणि सॉफ्टवेअरची जबाबदारी सांभाळणार आहेत.
टेस्लाकडे दुर्लक्ष झाल्याने गुंतवणूकदार संतापले
एलन मस्क यांनी ट्विटरची जबाबदारी हाती घेतल्यानंतर त्यांचे मुख्य कंपनी टेस्लाकडे दुर्लक्ष झाले होते. मागील सहा महिन्यात टेस्लाची कामगिरी सुमार ठरली. या पार्श्वभूमीवर टेस्लामधील बड्या गुंतवणूकदारांनी मस्क यांच्या दुहेरी भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली होती. याचा दबाव मस्क यांच्यावर दिसून आला आणि त्यांनी ट्विटरचे सीईओपद सोडल्याचे बोलले जाते.
'या' व्यक्तींची होतेय चर्चा
- एलन मस्क यांनी ट्विटरला नवीन सीईओ मिळाल्याचे जाहीर केले आहे मात्र त्याचे नाव उघड केलेले नाही. त्यामुळे ही व्यक्ती कोण याबाबत चर्चांना उधाण आले आहे.
- वॉल स्ट्रीट जर्नल या वृत्तपत्राने कॉमकास्ट एनबीसीयुनिर्व्हसलची कार्यकारी अधिकारी लिंडा याकारिनो या ट्विटरच्या पुढील सीईओ असतील, अशी शक्यता वर्तवली आहे.
- गेल्या महिन्यात मायामी येथे झालेल्या एका परिषदेत मस्क यांनी याकारिनो यांची मुलाखत घेतल्याचे बोलले जाते.
- याच परिषदेत याकारिनो यांनीही मस्क यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले होते.
- वर्ष 2011 मध्ये एनबीसीयूमध्ये रुजू झाल्यानंतर याकारिनो यांनी डिजिटल जाहिरातींचा महसूल वाढवण्यात महत्वाची भूमिका बजावली होती.
- याशिवाय याहूचे माजी सीईओ मारिसा मेअर, युट्यूबचे माजी सीईओ सुसान वोजकिक यांच्याही नावाची चर्चा आहे.
- न्युरालिंकचे शिवॉन झिलीस यांचे नाव देखील ट्विटरच्या सीईओ पदाच्या शर्यतीत असल्याचे बोलले जात आहे.