सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सला जास्तीत जास्त युजर फ्रेंडली करण्यासाठी टेक कंपन्यांमध्ये स्पर्धा लागली आहे. लॉंग व्हिडिओ सेवेत YouTube ची मक्तेदारी मोडून काढण्यासाठी मायक्रोब्लॉगिंग साईट असलेल्या ट्विटरने कंबर कसली आहे. ट्विटरचे सर्वोसर्वा एलन मस्क यांनी ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्ससाठी एका खास वैशिष्ट्याची घोषणा केली आहे.ट्विटरवर ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्सला 2 तासांचा व्हिडिओ अपलोड करण्याची सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.
टेस्ला कंपनीचे प्रमुख एलन मस्क यांनी गेल्या वर्षी ट्विटरला खरेदी केले होते. ट्विटरमध्ये प्रचंड नोकर कपात करण्यात आली होती. त्याशिवाय ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्ससाठी सशुल्क सेवा सुरु करण्यात आली होती. ट्विटरला सोशल मीडिया इंडस्ट्रीत आघाडीवर आणण्यासाठी आता मस्क यांनी मोठा निर्णय घेतला आहे. ट्विटरवर व्हिडिओ अपलोडींगचे ऑप्शन सुरु करुन मस्क यांनी थेट YouTube ला आव्हान दिले आहे.
मस्क यांनी गुरुवारी 18 मे 2023 रोजी या नव्या फिचर संदर्भात ट्विट करुन माहिती दिली. त्यात ते म्हणाले की ट्विटर ब्ल्यू व्हेरिफाई़ड युजर्स आता 2 तासांचा व्हिडिओ अपलोड शकतात. ट्विटरवर 8 जीबीचा व्हिडिओ अपलोड करणे आता ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्सला शक्य होणार आहे. मात्र ही सेवा पेड असल्याने ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्सला पैसे मोजावे लागतील. ट्विटरच्या लॉंग व्हिडिओ सेवेमुळे YouTube साठी नवा स्पर्धक तयार झाला आहे. याचा YouTube च्या व्यवसायावर कितपत परिणाम होईल, याबाबत जाणकारांमध्ये अद्याप मतमतांतरे आहेत.
आतापर्यंत केवळ वेबसाईटच्या माध्यमातून लॉंग व्हिडिओ पोस्ट करता येत होते. आता अॅपलच्या आयओएस अॅपमधूल युजर्सला व्हिडिओ अपलोड करता येणार आहे.ट्विटरने व्हिडिओ अपलोडींगची सुविधा सुरु करण्याबरोबरच ट्विटर ब्लू पेजमध्ये बदल केले आहेत. त्यानुसार ब्ल्यू व्हेरिफाईड युजर्सला व्हिडीओ फाईल 2 जीबी ते 8 जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते.
युजर्सने केले स्वागत, मस्क यांच्या घोषणेवर प्रतिक्रियांचा पाऊस
मस्क यांनी ट्विटरवर लॉंग व्हिडीओचे फिचर जाहीर केल्यानंतर ट्विटर युजर्सने जोरदार स्वागत केले आहे.त्यांच्या ट्विटवर 33 हजार रिट्विट करण्यात आले आहेत. यावर 18 हजार प्रतिक्रियांचा पाऊस पडला आहे. 2 लाख 89 हजार युजर्सनी या घोषणेचे स्वागत केले.