केंद्र अथवा राज्य सरकारकडून विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी विविध योजना राबवल्या जातात. त्यामध्ये केंद्र सरकारकडून उच्च शिक्षणासाठी शैक्षणिक कर्ज घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी व्याज अनुदान ही एक योजना राबवली जाते. केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाकडून आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या घटकांतील विद्यार्थ्यांसाठी केंद्रीय व्याज अनुदान योजना (Central Sector Interest Subsidy Scheme- CSIS) राबवण्यात येते.
आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी योजना-
केंद्राच्या उच्च शिक्षण मंत्रालयाकडून 2009 पासून CSIS ही योजना राबवली जात आहे. या योजनेअंतर्गत जे विद्यार्थी आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकामध्ये मोडतात. त्या विद्यार्थ्यांना शैक्षणिक कर्जाच्या व्याजातून सवलत (Interest Subsidy Scheme) मिळते. या योजनेमुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल(EWC) असणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी काढलेल्या कर्जावरील व्याजातून सवलत मिळते. विद्यार्थ्यांना शैक्षणिक अभ्यासक्रमाचा कालावधी आणि त्यावर एक वर्षापर्यंत व्याज माफ केले जाते. म्हणजे तुमचा शैक्षणिक कालावधी 3 वर्षाचा असेल तर सरकार 4 वर्षापर्यंत तुमच्या कर्जाचे व्याज भरते. यासाठीचे नियम व अटी पुढील प्रमाणे आहेत.
व्याज अनुदानाचे निकष-
सेंट्रल सेक्टर इंटरेस्ट सबसिडी ही योजना आर्थिकदृष्ट्या दुर्बल असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी सुरू करण्यात आली आहे. तसेच मान्यताप्राप्त संस्थेमधून तंत्रज्ञान किंवा व्यावसायिक उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना या व्याज अनुदानाचा लाभ घेता येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे 4.5 लाख रुपयांपेक्षा जास्त नसाले. व्याज अनुदानाची ही सवलत विद्यार्थ्यांना शेड्यूल बँकाकडून घेतलेल्या कर्जासाठीच उपलब्ध आहे. या योजनेअंतर्गत सरकारकडून केवळ 10 लाख रुपयांपर्यंतच्या शैक्षणिक कर्जावरचे व्याज अनुदान दिले जाते. या शिवाय विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभा पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण या कालावधीत फक्त एकदाच घेता येतो.
कसा मिळेल अनुदानाचा लाभ?
या योजनेसाठी नोडल बँक म्हणून कॅनरा बँकेची नियुक्ती करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांनी व्याज अनुदान योजनेच्या अधिक माहितीसाठी ज्या बँकेकडून शैक्षणिक कर्ज घेतले आहे. त्यांच्याशी संपर्क साधणे गरजेचे आहे. तसेच शैक्षणिक कर्ज मंजूर करणाऱ्या बँकेने कॅनरा बँकेच्या पोर्टलवर व्याज अनुदानाचा दावा दाखल करणे गरजेचे आहे. या बाबतच्या अधिक माहिती साठी कॅनरा बँकेच्या संकेतस्थळाला भेट देणे द्या.
 
     
     
                 
                                             
                                             
                                             
                                             
                                            