दक्षिण भारतातील मोठ्या ज्वेलर्सपैकी एक असलेल्या जॉयलुक्कास ज्वेलर्सला (Joyalukkas jewelers) दुबईत कॅश ट्रान्सफर करणे महागात पडले आहे. जॉयलुक्कास ज्वेलर्सवर हवालाद्वारे पैसे पाठण्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. रोख निधी हस्तांतर करताना परदेशी चलन विनियम कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी सक्तवसुली संचनालयाने (ED) जॉयलुक्कास ज्वेलर्सची 305 कोटींची संपत्ती जप्त केली आहे. ईडीच्या या धडक कारवाईने सराफा उद्योगात खळबळ उडाली आहे. (ED attaches over Rs 305 crore worth of assets of Joyalukkas jewellery group)
केरळमध्ये मुख्य बेस असलेल्या जॉयलुक्कास ज्वेलर्सला ईडीने दणका दिला आहे. दुबईत हवालाद्वारे पैसे पाठवण्यात आल्याचे ईडीच्या चौकशीत समोर आले आहे. ईडीने फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या 33 प्रॉपर्टीज जप्त केल्या आहेत. या प्रॉपर्टींचे बाजार मूल्य 81.5 कोटी इतके आहे. यात त्रिशूर शहरातील एक इमारत आणि जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या मालकीच्या जमिनीवर टाच आणली आहे. बँकांमधील जॉयलुक्कास ज्वेलर्सची तीन खाती गोठवण्यात आली आहेत. यात जवळपास 91 लाख 22 हजार रुपयांची रक्कम आहे. त्याशिवाय 5.58 कोटींची मुदत ठेवी आणि जॉयलुक्कास इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे 217.81 कोटींचे शेअर्स जप्त करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे.
ईडीने जॉयलुक्कास ज्वेलर्सवर परकीय चलन विनिमय व्यवस्थापन कायदा कलम 37 ए नुसार संपत्ती जप्तीची कारवाई केली आहे. जप्त केलेल्या संपत्तीचे एकूण मूल्य 305.84 कोटी इतके आहे. या कारवाईपूर्वी ईडीने जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या केरळमधील शोरुम्स आणि कार्यालयांवर धाड टाकली होती. जॉय अलुक्कास वर्गिस यांच्या मालकीच्या संपत्तीची चौकशी करण्यात आली. त्यामुळे जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे.
फेमा कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी ईडीकडून करण्यात आलेली अलिकडच्या काळातील ही मोठी कारवाई आहे. दरम्यान, जॉयलुक्कास ज्वेलर्सने आयपीओसाठी केलेल्या तयारीला मोठा झटका बसला आहे. कंपनीने कर्ज चुकती करणे आणि नवीन आठ शोरुम सुरु करण्यासाठी 2300 कोटींचा आयपीओ आणण्याचे नियोजन केले होते. मात्र ईडीच्या कारवाईने जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या प्रतिमेला धक्का बसला आहे.
काय आहे 'ईडी'चा आरोप
जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या दुबईमधील जॉयलुक्कास ज्वेलर्स एलएलसी या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी भारतातून बेकायदेशीररित्या मोठी रक्कम पाठवण्यात आली आहे. ही नियमबाह्य रक्कम पाठवण्यासाठी हवाला चॅनल्सचा वापर करण्यात आल्याचा दावा ईडीने केला आहे. जॉय अलुक्कास वर्गिस यांची 100% मालकीची दुबईतील ही कंपनी आहे. ईडीने या हवाला व्यवहारांची सखोल चौकशी केल्यानंतर महत्वाचे ई-मेल आणि कागदपत्रे तपासात सापडली आहेत. त्यात पैसे हस्तांतर करण्यासाठी हवालाचा वापर झाल्याचे उघड झाले आहे.
कोण आहेत जॉल अलुक्कास?
जॉय अलुक्कास हे केरळमधील एक मोठे उद्योजक आहेत. जॉयलुक्कास ग्रुपचे चेअरमन आणि मॅनेजिंग डायरेक्टर आहेत. जॉय अलुक्कास यांचे वडिल वर्गिस अलुक्कास यांनी सराफ व्यावसायिक होते. त्यांनी 1956 मध्ये केरळमध्ये पहिली सराफ पेढी सुरु केली होती. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत जॉय अलुक्कास यांनी वर्ष 2001 मध्ये जॉय अलुक्कास ज्वेलरी ही नवीन कंपनी सुरु केली. सराफ व्यवसायात नवनवीन संकल्पना राबवत त्यांनी हा व्यवसाय सातासमुद्रापार नेला. 1987 मध्ये त्यांनी अबुधाबीमध्ये जॉयलुक्कासचे पहिले परदेशातील स्टोअर सुरु केले होते. जॉय अलुक्कास ज्वेलर्सची भारतात 85 शोरुम्स असून 45 शोरुम्स परदेशात आहेत. जॉयलुक्कासकडून फॉरेव्हरमार्क डायमंड्सची विक्री करते. फोर्ब्सच्या अहवालानुसार जॉय अलुक्कास यांची एकूण संपत्ती 3.1 बिलियन डॉलर्स इतकी आहे. वर्ष 2022 च्या श्रीमंत उद्योजकांच्या यादीत जॉय अलुक्कास 69 व्या स्थानी आहेत. जॉय अलुक्कास यांचा मुलगा जॉन पॉल कंपनीचा आंतरराष्ट्रीय व्यवसाय सांभाळतो.ॉ
IPO चा प्रस्ताव तडकाफडकी रद्द केला होता (Joyalukkas Jewellery Called Off IPO)
जॉयलुक्कास ज्वेलर्सने प्रारंभिक समभाग विक्रीतून 2300 कोटींचे भांडवल उभारण्याचे नियोजन केले होते. (Joyalukkas Jewellery Called Off IPO) कंपनीने आयपीओसाठी जोरदार तयारी केली होती. मात्र दोनच दिवसांपूर्वी जॉयलुक्कास ज्वेलर्सकडून आयपीओ प्रस्ताव तडकाफडकी रद्द करण्याची घोषणा करण्यात आली. आयपीओ रद्द करण्याबाबत कोणतेही कारण देण्यात आले नाही. त्यामुळे शेअर मार्केटमध्ये जॉयलुक्कास ज्वेलर्सच्या आयपीओबाबत चर्चांना उधाण आले आहे.