Manipur Violence: ईशान्य भारतातील मणिपूर राज्यामध्ये वांशिक हिंसाचार उसळल्याने जनजीवन विस्कळीत झाले आहे. या हिंसाचारात दीडशेपेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झालाय. आता परिस्थिती नियंत्रणात आली असली तरी बाजारपेठ आणि व्यापार सुरळीत झाला नाही. मागील काही दिवसांपासून राज्यातील 80% निर्यात रोडावली आहे. त्यामुळे उद्योग आणि कामगार वर्ग आर्थिक अडचणीत सापडला आहे.
मणीपुरी कापड जगभर प्रसिद्ध
मणिपूर राज्यात हातमागावर तयार होणारे कापड अमेरिका, युरोप आणि सिंगापूर देशात प्रसिद्ध आहे. या देशांमध्ये कापड निर्यात होते. मौरेनगफी, लैरुम, लासिंगफी, फानिक हे कापड प्रसिद्ध आहे. हातमागावर हे कापड तयार केले जाते. मात्र, निर्यात रोडावल्याने विणकर आणि उद्योग ठप्प झाले आहेत. राज्यातील संचारबंदीमुळे मालाची वाहतूक करता येत नाही.
यासोबतच मणिपूर राज्यातील औषधी वनस्पती आणि खाद्यपदार्थांचीही निर्यात होते. हिंसाचारामुळे या वस्तूंची निर्यात 80 टक्क्यांनी खाली आली आहे, असे North East Federation of International Trade (NEFIT) चे उपाध्यक्ष एम. चंद्रकिशोर यांनी म्हटले आहे.
व्यापारी मार्ग बंद
भारत-म्यानमार सीमेवरील मोऱ्हे व्यापारी केंद्र ठप्प आहे. हे व्यापारी केंद्र इम्फाळपासून 110 किलोमीटर अंतरावर आहे. डोंगराळ भाग असल्याने म्यानमार आणि आशियाई देशांना मालाची वाहतूक करण्यासाठी हा एकमेव मार्ग मोऱ्हेमधून जातो. मात्र, हिंसाचारामुळे गाड्यांची वाहतूक बंद आहे. 2022 वर्षात एकूण निर्यातीमधील हातमागावरील कापड निर्यातीचा वाटा 44% होता. मात्र, यावर्षी ही निर्यात हिंसाचारामुळे कमी झाली आहे.
बँका, वित्तसंस्था, एटीएम सुद्धा बंद आहेत. फक्त शासकीय आणि एमर्जन्सी वाहनांना परवानगी देण्यात आली आहे. मणिपूरमध्ये सुमारे साडेचार लाख हातमाग विणकर आहेत. तसेच हातमागांची संख्याही जास्त आहे. हिंसाचारामुळे कारखाने बंद असून कामगार घरी अडकून पडले आहेत.
मणिपूरमधील वांशिक हिंसाचार काय आहे?
मैतेई विरुद्ध कुकी आणि नागा समुदायामध्ये आरक्षणाविरूद्ध उफाळलेल्या हिंसाचारात संपूर्ण राज्य होरपळून निघाले आहे. तेथील उच्च न्यायालयाने मैतेई समाजाला अनुसूचित जमातीचा दर्जा देण्याचा निर्णय घेतला. या निर्णयाचा कुकी आणि नागा समुदायाने विरोध केला. आपल्या आर्थिक आणि नोकरीच्या संधी मैतई हिरावून घेतील या भीतीतून हिंसाचार उफळला. तसेच अफवा पसरल्यानेही हिंसाचार आणि जाळपोळ झाली.