साधारणत: दैनंदिन जीवनातील वस्तुंचे भाव हे नेहमी बदलत असतात. नुकताच शंभरी गाठलेला टोमॅटो अजूनही आटोक्यात येण्याचे नाव काढत नाही. तर काही महिन्यांपूर्वी कांद्याच्या भावाने सर्वसामान्यांच्या नाकीनऊ आणले होते. पण आता कांदा योग्य भावात सर्वसामान्यांना मिळत आहे. अशाप्रकारे महागाई आणि चलनवाढीमुळे वस्तुंच्या किमतीत सतत बदल होत असतात. यात एकतर किंमत वाढते किंवा कमी होत असते. पण सध्याच्या घडीला किमती वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. या किमती वाढल्या की, बाजारभावातून आपल्याला कळतात. पण यात नेमकी वाढ होते कशी आणि ती कशी मोजतात, हे आपण समजून घेणार आहोत.
भारताचा महागाईचा आलेख वाढतच असल्याचे दिसून येत आहे. मे महिन्यात भारताचा महागाई दर 15.88 टक्क्यांवर पोहोचला आहे. एप्रिल महिन्यात तो 15.08 टक्के होता. नुकताच देशातील वस्तुंच्या किमतीत होणाऱ्या बदलांचा होलसेल प्राईस इंडेक्स (WPI) अहवाल प्रसिद्ध केला आहे. या अहवालानुसार 2021-22 मध्ये ग्राहकोपयोगी वस्तू आणि मालमत्तेच्या किमतीत 4.42 टक्के वाढ झाली आहे. ही दरवाढ गेल्या 10 वर्षांमधील उच्चांकी वाढ मानली जाते. इंधन, मेटल, केमिकल आणि अन्न-धान्यांच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे महागाईचा दर वाढल्याचे या अहवालातून दिसत आहे.
या अहवालानुसार, भाजीपाल्याच्या किमती 56.36 टक्क्यांनी तर गव्हाच्या किमती 10.55 टक्क्यांनी वाढल्या आहेत. इंधन आणि ऊर्जेच्या दरात 40.62 टक्के तर क्रुड ऑईल आणि नैसर्गिक गॅसच्या किमतीत 79.50 टक्क्यांनी महागाई वाढल्याचे निरीक्षण नोंदवण्यात आले आहे. मासे, मांसाहार, अंड्यांच्या किमतीमध्येही 7.78 टक्के वाढ झाली. गेल्या 14 महिन्यांपासून महागाईचा दर हा सतत 10 टक्क्यांपेक्षा अधिक नोंदवला गेला आहे. हा दर घाऊक मूल्यावर आधारित आहे. सध्या किरकोळ महागाईमध्ये थोडीफार घसरण पहायला मिळाली आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाईचा दर 7.79 टक्के होता, मे महिन्यात 7.04 टक्क्यांवर आला आहे. तरीही हा किरकोळ महागाईचा दर रिझर्व्ह बॅंकेच्या लक्ष्यापेक्षा जास्तच आहे.
घाऊक किंमत निर्देशांक म्हणजे काय? What is Wholesale Price Index?
वस्तूंच्या घाऊक किमतीच्या दरांची पातळी दर्शविणाऱ्या निर्देशांकास घाऊक किमतींचा निर्देशांक म्हटलं जातं. वस्तुंच्या घाऊक किमतींवरून हा निर्देशांक काढला जातो. केंद्रीय वाणिज्य मंत्रालयातील तज्ज्ञांद्वारे घाऊक किंमत निर्देशांक अहवाल प्रसिद्ध केला जातो. 2010 पासून हा WPI निर्देशांक काढला जात आहे. हा निर्देशांक प्रथामिक वस्तू, इंधन आणि उत्पादित वस्तू अशा 3 गटातील वस्तुंवर आधारित काढला जातो.