Aren't we all searching for something?

Not sure what to search? Here are some topics that we can suggest you:

Digital Rupee Vs Cryptocurrency: डिजिटल रुपी, क्रिप्टोकरन्सीपेक्षा वेगळा आहे, कारण...

Digital Rupee Vs Cryptocurrency

Digital Rupee Vs Cryptocurrency: अलीकडेच बाजारात आलेला डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सीमध्ये असलेले मूलभूत फरक आधी समजून घ्या.

रिझर्व्ह बँकेनं (RBI) अलीकडेच आपल्या रुपयाचं अधिकृत आभासी चलन (CBDC) म्हणजे डिजिटल रुपी किंवा ई-रूपी बाजारात आणला आहे. प्रायोगिक तत्त्वावर सामान्य लोकांसाठीही हा डिजिटल रुपया आता उपलब्ध झाला आहे. त्याचे फायदे आणि तो कसा वापरायचा हे या लिंकमध्ये पाहा.

हा डिजिटल रुपया पूर्णपणे आभासी आणि ऑनलाईन व्यवहारांसाठी वापरायचा आहे. पण, त्यामुळे अनेकजण नकळतपणे त्याची तुलना क्रिप्टोकरन्सीशी करत आहेत. आणि रिझर्व्ह बँकेनं काढलेली ही क्रिप्टोकरन्सी आहे असा काहींचा समज झाला आहे. पण, प्रत्यक्षात डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सी यांचा उपयोग आणि मूळ संकल्पना एकदम वेगळी आहे. दोघांमध्ये काय फरक आहे हे समजून घेऊया.

डिजिटल रुपी म्हणजे काय? What is Digital Rupee?

सोप्या शब्दांत सांगायचं तर डिजिटल रुपी म्हणजे नोटा किंवा नाण्यांची डिजिटल आवृत्तीच आहे. रिझर्व्ह बँक ही आपली मध्यवर्ती बँकच डिजिटल रुपी बाजारात आणत असते. आणि डिजिटल रुपीमुळे पैशांचे व्यवहार अधिक सोपे, सुटसुटीत आणि सुरक्षित होणं अपेक्षित आहे. शिवाय दोन्हीचं मूल्यही सारखंच आहे. म्हणजे एका डिजिटल रुपीचं मूल्य एका रुपयाच्या नोटे एवढंच आहे. थोडक्यात, डिजिटल रुपीचा वापर आपण नोटा आणि नाण्यांना पर्याय म्हणून करू शकतो. आणि तेच त्याचं उद्दिष्टं आहे. क्रिप्टोकरन्सी मात्र आर्थिक देवाण घेवाणीबरोबरच ट्रेडिंगसाठीही वापरली जाते.

क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय? What is Cryptocurrency?

क्रिप्टोकरन्सी हे एक प्रकारचं आभासी चलन आहे. या चलनाच्या देवाणघेवाणीसाठी क्रिप्टोग्राफिक कोड वापरला जातो म्हणून त्याला हे नाव मिळालंय. पण, या चलनातील व्यवहारांवर कुणाचंही नियंत्रण नसतं. आणि व्यवहारही पिअर टू पिअर म्हणजे थेट होतात. यामध्ये बँक किंवा कुठलीही वित्तीय संस्था यांची मध्यस्थी नसते. या वैशिष्ट्यांमुळे क्रिप्टोकरन्सी तरुणांमध्ये लोकप्रिय आहे आणि डिजिटल रुपीपेक्षा वेगळी आहे. कसं ते बघूया…

डिजिटल रुपी वि. क्रिप्टोकरन्सी Digital Rupee Vs Cryptocurrency

  • वरती म्हटल्याप्रमाणे डिजिटल रुपी हे रिझर्व्ह बँकेनं काढलेलं चलन आहे. आणि त्यावर बँकेचं प्रत्यक्ष नियंत्रणही असणार आहे. तर क्रिप्टोकरन्सीवर कुणाचंही नियंत्रण नाही. आणि झालेले व्यवहारही थेट होतात. अगदी हे चलन स्वीकारणाऱ्यालाही चलन कुठून आलंय ते समजत नाही. 
    डिजिटल रुपी नियंत्रित असल्याचा फायदा ग्राहकांना असा होतो की, त्याचं मूल्य स्थिर राहतं. आणि रिझर्व्ह बँक ठरवेल तेच कायम राहतं. म्हणजे एका डिजिटल रुपीचं मूल्य एक रुपया असणार आणि तेच कायम राहणार हे ठरलेलं आहे. उलट क्रिप्टोकरन्सीमध्ये ट्रेडिंग होत असल्यामुळे तिचं मूल्य बदलत राहतं. मागणी आणि पुरवठा तत्त्वानुसार त्यात बदल होतात. त्यामुळे क्रिप्टोकरन्सीचं मूल्य स्थिर न राहता कमी किंवा जास्त होऊ शकतं. ही मोठी जोखीम आहे. 
  • डिजिटल रुपी आणि क्रिप्टोकरन्सी हे ब्लॉकचेन या सुरक्षित तंत्रज्ञान प्रणालीवर आधारित आहेत हे खरं. पण, क्रिप्टोकरन्सीतील ब्लॉकचेन खुली आहे. तर डिजिटल रुपीची ब्लॉकचेन खाजगी सरकारने तयार केलेली आणि त्यांचं नियंत्रण असलेली आहे. या वैशिष्ट्यामुळे क्रिप्टोकरन्सीमधले व्यवहार कुणाला कळत नाहीत. तर डिजिटल रुपीतील व्यवहार बँकांना कळतातही, त्यांची नोंदही ठेवली जाते. आणि देवाण घेवाण करणाऱ्यांनाही कुठून पैसे आले ते कळू शकतं. 
  • या दोन्ही चलनांचा हेतू हा आणखी एक मूलभूत फरक दोघांमध्ये आहे. आणि तो समजल्यावर तंत्रज्ञानात असलेला फरक समजून घेणं सोपं जाईल. डिजिटल रुपी हा आर्थिक देवाण घेवाण, खरेदी-विक्री यासाठी वापरला जातो. म्हणजे एखादा अर्थिक व्यवहार घडवून आणण्यासाठी. याउलट क्रिप्टोकरन्सी फक्त देवाण घेवाणीसाठीच नाही तर गुंतवणुक म्हणूनही वापरली जाते. म्हणजेच ते एक चलन आहे आणि गुंतवणुकीचं साधनही. 
  • क्रिप्टोकरन्सी आर्थिक व्यवहारांसाठी सगळीकडे वापरली जाईलच असं नाही. अनेक देशांमध्ये खरेदी-विक्रीसाठी ती वापरण्याला परवानगीही नाहीए. पण, गुंतवणुकीचं साधन म्हणून जोखमी असूनही तरुणांमध्ये लोकप्रिय आहे. कारण, महागाई, देशाची आर्थिक परिस्थिती यांचा थेट परिणाम डिजिटल रुपीवर होतो. याउलट अनियंत्रित बाजारात काम करणाऱ्या क्रिप्टोकरन्सीकडे महागाई दरावर मात करू शकेल असं गुंतवणुकीचं साधन म्हणून बघितलं जातं.

Disclaimer : क्रिप्टोकरन्सीतील गुंतवणूक जोखमीची आहे आणि त्यात गुंतवणूक करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरुर घ्या.