पहिली मुलगी धनाची पेटी अशी म्हण आपल्याकडे आहे. पण त्या मुलीला वडिलांच्या संपत्तीत वाटा मिळतो का? तशी तरतूद कायद्यामध्ये आहे का? हे या लेखातून समजून घेऊ.आपल्याकडे विवाहित महिलांना त्यांच्या वडिलांच्या संपत्तीत कायद्याने वाटा मिळण्याची तरतूद आहे. त्यामुळे लग्न झालेल्या मुलीला तिच्या वडिलांच्या मृत्यू पश्चात त्यांच्या संपत्तीत वाटा मिळतो. विवाहित मुलींना वडिलांच्या संपत्तीत समान वाटा मिळावा म्हणून 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायद्यामध्ये सुधारणा करण्यात आली होती. (Hindu Succession Act in 1956) वडिलांच्या मृत्यूपश्चात किंवा वडिलांची इच्छा नसतानाही त्यांच्या मालमत्तेत मुलगा आणि मुलीला त्यांच्या संपत्तीत समान वाटा मिळतो.
वडिलांच्या संपत्तीचे दोन भागांमध्ये वर्गीकरण
- वडिलांनी स्वतः कमवलेली संपत्ती
- वडिलोपार्जित संपत्ती
वडिलांनी स्वतः कमवलेली संपत्ती
वडिलांनी स्वतः कमवलेल्या संपत्तीत मुलीला हक्क मिळेलच असे होत नाही. वडिलांनी जर स्वतः जमीन खरेदी केली असेल, स्वतः घर बांधले असेल तर अशी संपत्ती त्यांना कोणालाही देण्याचा कायदेशीर हक्क वडिलांचा असतो. म्हणजेच जर वडिलांनी स्वतः कमवलेल्या संपत्तीतून मुलीला डावलले असेल तर ती मुलगी काहीच करू शकत नाही.मृत्यूपत्र लिहिण्यापूर्वीच वडिलांचा मृत्यू झाल्यास त्यांनी स्वतः कमवलेल्या संपत्तीत सर्व कायदेशीर मालकांना संपत्तीतील समान हक्क मिळतो. म्हणजेच मुलींनाही मुलांप्रमाणे समान हक्क मिळतो. वडिलांनी जर मृत्यूपत्रात आपल्या संपत्तीतील हक्क मुलीला देण्यास नकार दिला असेल तर मात्र मुलगी काहीच करू शकत नाही.
विवाहित मुलीचा माहेरच्या संपत्तीवरील हक्क संपतो का?
2005 पूर्वी विवाहित मुलीला कागदोपत्री ती तिच्या माहेरच्या कुटुंबाचा भाग नाही असे मानण्यात येत असे. 2005 मध्ये कायद्यात सुधारणा करण्यात आली. त्यानुसार विवाहित मुलीचा तिच्या वडिलांच्या संपत्तीतील हक्क अबाधित ठेवण्यात आला. हिंदू वारसा हक्क कायद्यानुसार जर मुलीचा जन्म हा 9 सप्टेंबर 2005 पूर्वी किंवा त्यानंतर झाला असल्यास वडिलांच्या हयातीत मुलगा आणि मुलगी दोघेही वडिलांनी कमावलेल्या संपत्तीत समान वाटेकरी होतात. म्हणजेच जर वडील जिवंत असतील तर मुलगी त्यांच्या संपत्तीत समान वाटा मिळवू शकते. पण कायदा लागू होण्यापूर्वी वडिलांचा मृत्यू झाला असल्यास तर मात्र मुलींचा वडिलांनी कमावलेल्या संपत्तीवर काही अधिकार राहत नाही. अशावेळी वडिलांच्या इच्छेनुसार संपत्तीची वाटणी होते. वडील स्वतःने कमावलेली संपत्ती आपल्या मुलाच्या नावावर करू शकतात. पण जर पत्नीपासून विभक्त झाले असतील तर मात्र पत्नी आपल्या पतीला विरोध करू शकते. तसेच ती पोटगी मागू शकते. त्याचप्रमाणे मुलगीही वडिलांच्या ह्या निर्णयाला कायदेशीर आव्हान देऊ शकते.
अनुकंपा तत्वावर नोकरी मिळवण्याचा अधिकार
नोकरीवर असतानाच वडिलांचा मृत्यू झाला असल्यास त्यांच्या जागेवर अनुकंपा तत्त्वावर मुलाबरोबर मुलीचासुद्धा नोकरीवर समान अधिकार असतो. मग ती मुलगी विवाहित असो किंवा नसो तिला नोकरीचा अधिकार नाकारता येत नाही. वडिलांच्या नोकरीवर विवाहित मुलगी दावा करु शकते.
वडिलोपार्जित संपत्ती
वडिलोपार्जित संपत्तीत पूर्वजांपासूनच्या संपत्तीचा समावेश होतो. वडिलोपार्जित संपत्तीवर 2005 पूर्वी मुलाचाच अधिकार होता. पण 2005 मध्ये कायद्यात बदल होऊन मुलींनाही वडिलोपार्जित संपत्तीत वाटा मिळू लागला. वडिलोपार्जित संपत्तीची वाटणी वडील आपल्या इच्छेप्रमाणे करू शकत नाहीत. मुलीला जन्मतःच वडिलोपार्जित जमिनीचा हक्क मिळतो.