यंदा मॉन्सूनच्या (Monsoon) पावसाला उशिरा सुरुवात झाली. त्यापूर्वी बेमोसमी पावसानं ठिकठिकाणी हजेरी लावत मोठं नुकसान केलं. मात्र जवळपास महिनाभर उशिरा आलेल्या मॉन्सूननंदेखील आता नुकसानच (Loss) केल्याचं दिसून येत आहे. देशातल्या विविध राज्यांत सुरू असलेल्या अतिवृष्टीनं शेतातलं पीक अक्षरश: उद्ध्वस्त (Crop damaged) झालं आहे. त्यासोबतच पीकांवर केलेला खर्चही पाण्यात वाहून गेला आहे. कर्जबाजारी शेतकऱ्यांची अवस्था अधिक बिकट आहे.
Table of contents [Show]
खाद्यपदार्थांसह भाजीपाला महागला
देशात एकीकडे खाद्यपदार्थांचे, भाज्यांचे भाव वरचेवर वाढताना दिसत आहेत. त्यात सातत्यानं पडणाऱ्या पावसानं भर घातली आहे. कांद्याचं पीक तर नष्ट झालंच. मात्र बेमोसमी पावसानं रबीच्या पिकांचाही चुराडा केला आहे. हरभरा, मका, गहू, काजू यासह विविध पिकांचं प्रचंड नुकसान झालं आहे. टोमॅटोच्या पीकाचंही नुकसान झालं. त्यानंतर देशभर टोमॅटोचे दर वाढल्याचं पाहायला मिळालं. आजच्या घडीला टोमॅटोचा भाव 120 ते 150 रुपये किलो इतका आहे.
पिकांचं नुकसान
देशातल्या विविध राज्यांचा विचार केल्यास उत्तर-पश्चिम राज्यांत पावसाचं प्रमाण 59 टक्के जास्त राहिलं. खरीप पिकांना याचा अधिक धोका आहे. या पावसानं पिकांचं पेरणी क्षेत्रही घटलं आहे. 21 जुलैपर्यंत विविध कडधान्यांच्या पेरणीचं क्षेत्र मागच्या वर्षीच्या तुलनेत घटलं आहे. यात पश्चिम बंगाल, हरयाणा, उत्तर प्रदेश, पंजाब त्याचप्रमाणे आंध्रप्रदेश याठिकाणच्या पीकांचंही नुकसान झालं आहे.
खरीप पिकांचं क्षेत्र घटलं
राज्याचा विचार केल्यास, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या प्रमुख कृषी क्षेत्रांमध्ये अधिक पर्जन्यवृष्टी झाली आहे. मध्य महाराष्ट्रात 27 टक्के, मराठवाड्यात 110 टक्के तर विदर्भात 31 टक्के इतका जास्त पाऊस पडला आहे. याचा परिणाम खरीप पिकांचं क्षेत्र 23 टक्क्यांनी घटलं असून ते 9.1 दशलक्ष हेक्टरवर आलं आहे. अतिवृष्टी झालेल्या परिसरात प्रामुख्यानं सोयाबीन, तूर, उडीद, मका, कापूस, बाजरी तसंच ऊस या पिकांचं उत्पादन घेतलं जातं.
जीडीपीत 12 टक्के वाटा
अर्थव्यवस्थेत या पिकांचं स्थान महत्त्वाचं आहे. राज्यातली तर जवळपास 82 टक्के ग्रामीण भागातली लोकसंख्या शेतीवर अवलंबून आहे. राज्याच्या जीडीपीमध्ये या क्षेत्राचा वाटा जवळपास 12 टक्के इतका आहे. अशावेळी सातत्यानं होणारं नुकसान राज्याच्या अर्थव्यवस्थेलाही मागे नेणारं आहे.