गेल्याचं महिन्यात दिवाळी झाली. दिवाळीचा सण म्हटला की बहुतेक लोक खरेदीचा मनमुराद आनंद लुटतात. यातले काहींनी यासाठी क्रेडिट कार्डचा भरमसाठ वापर केला असेल. कित्येक जण तर असे असतात की, खरेदीचा मोह त्यांना अनावर होतो आणि खिशात हात घालून क्रेडिट कार्ड बाहेर काढले जाते. यातल्या काहींना नंतर मात्र पश्चाताप होतो. आपण क्रेडिट कार्डवर ही खरेदी करायला नको होती, असे वाटून तर जाते पण वेळ निघून गेलेली असते. मात्र यानंतरसुद्धा काही जण एक अशी चूक करतात की ज्यामुळे त्यांचं दिवाळं निघतं. ही चूक कोणती ते आता आपण बघूया. ( Credit Card Repayment , avoid mistake after shopping through credit card)
ज्या वेळी तुम्ही तुमच्या क्रेडिट कार्डवरून खरेदी करता तेव्हा तुम्हाला ही उधार म्हणून घेतलेली रक्कम एका विशिष्ट कालावधीत परत करावी लागते. सामान्यपणे हा कालावधी 20 ते 50 दिवसांच्या दरम्यान असतो. समजा तुम्ही या कालावधीत पैसे भरलेत तर तुम्हाला कोणताही व्याजदर लागत नाही. पण, जर तुम्ही जर या मुदतीत कर्ज रकमेची परतफेड करण्यात अपयशी ठरलात तर मात्र तुम्हाला व्याजदर लागू होईल. काही जण अशी चूक करतात की, क्रेडिट कार्डवरील रकमेचा भरणा वेळेवर न करता ते आपल्याजवळ असलेली रक्कम बचत खात्यात (saving account) जमा करतात किंवा मुदत ठेवीत (fund deposit) गुंतवतात.
मिळणाऱ्या व्याजापेक्षा भरावी लागणारी रक्कम अधिक
बचत खाते किंवा मुदत ठेव यामध्ये मिळणाऱ्या परताव्यापेक्षा कितीतरी पट अधिक क्रेडिट कार्डवर खरेदी केलेल्या रकमेवर व्याज भरावे लागते. अनेकदा हे पाच पट सुद्धा अधिक असू शकते. मुदत ठेवीच्या व्याजाचे दर सामान्यपणे वार्षिक 6% ते 7% असतात आणि बचत खात्यावरील वार्षिक व्याजदर 3% ते 6% इतके असतात. क्रेडिट कार्डवरील व्याजाचे दर मात्र मासिक 2.5% ते 3.5% इतका असतो. म्हणजे वार्षिक 30 ते 42% इतके व्याज भरावे लागते. आणि याच गोष्टीकडे काही जण दुर्लक्ष करतात. यामुळे त्यांना मोठे आर्थिक नुकसान सोसावे लागते.
दिवाळी झाली, आता असं टाळा दिवाळं
आताही क्रेडिट कार्डवर दिवाळी साजरी करून तुम्ही पस्तावला असाल तर ही चूक टाळणे तुमच्या हातात आहे. खूप सारी खरेदी झाल्याने मुदत ठेव किंवा बचत खात्यात आपले पैसे सुरक्षित करावेत असे वाटणे साहजिक आहे. मात्र यामुळे क्रेडिट कार्डवर खरेदी केलेली रक्कम भरण्यात दिरंगाई झाल्यास तुम्हाला तुमच्या बचत व गुंतवणुकीतून मिळणाऱ्या व्याजापेक्षा अधिक रक्कम उधारीवरील व्याज चुकवावे लागेल. जे योग्य आर्थिक नियोजनाने तुम्ही नक्की टाळू शकता.
पर्याय | वार्षिक व्याजदर |
बचत खाते | 3 % ते 6 % |
मुदत ठेव | 6% ते 7% |
क्रेडिट कार्ड | 30 % ते 40 % |