क्रेडीट कार्डमधील थकबाकीने बँकांची डोकदुखी वाढवली आहे. गेल्या आर्थिक वर्षात क्रेडीट कार्ड डिफॉल्टमुळे बँकांचे 4 हजार 72 कोटी बुडाले असल्याची माहिती समोर आली आहे.
रिझर्व्ह बँकेच्या माहितीनुसार क्रेडीट कार्डमधील डिफॉल्टचा आकडा आर्थिक वर्ष 2022-23 मध्ये 4 हजार 72 कोटी रुपयांपर्यंत वाढला आहे. त्यापूर्वी मार्च 2022 अखेर क्रेडीट कार्ड डिफॉल्टचे प्रमाण 3 हजार 122 कोटी इतकी होती.
केंद्र सरकारच्या वतीने क्रेडीट कार्ड डिफॉल्टचा तपशील मंगळवारी संसदेत सादर करण्यात आला. बँकांनी क्रेडीट कार्डचे मोठ्या संख्येने वितरण केले आहे. 31 मार्च 2023 अखेर क्रेडीट कार्ड्सधारकांकडील एकूण थकबाकी 2.10 लाख कोटी इतकी प्रचंड आहे. 31 मार्च 2022 अखेर हे प्रमाण 1.64 लाख कोटी इतके होते.
अर्थराज्य मंत्री डॉ. भागवत कराड यांनी संसदेत क्रेडीट कार्ड डिफॉल्टचा तपशील मांडला. ते म्हणाले की क्रेडीट कार्ड डिफॉल्टमुळे बुडीत कर्जांचे प्रमाण 1.94% इतके आहे. हे प्रमाण मार्च 2021 अखेर 3.56% इतके होते.
भारतीयांमध्ये क्रेडीट कार्ड वापरण्याचे प्रमाण वाढले आहे. रिझर्व्ह बँकेच्या ताज्या अहवालानुसार पेमेंटसाठी क्रेडीट कार्डचा वापर वाढला आहे. गेल्या वर्षात क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 1.33 लाख कोटींचे व्यवहार करण्यात आले.
पेमेंटच्या बाबतीत क्रेडीट कार्डने डेबिट कार्डला मागे टाकले. गेल्या वर्षात क्रेडीट कार्ड स्वाईप देखील 20% वाढल्याचे दिसून आले होते. मात्र यामुळे क्रेडीट कार्डमधील डिफॉल्ट देखील तितक्याच प्रमाणात वाढत आहे. परिणामी बँकांची चिंता वाढली आहे.
देशभरात 8.5 कोटी क्रेडीट कार्ड्स सक्रिय
रिझर्व्ह बँकेच्या आकडेवारीनुसार भारतात जवळपास 8.5 कोटी क्रेडीट कार्ड सक्रिय आहेत. गेल्या वर्षी हे प्रमाण 7.5 कोटी इतके होते. क्रेडिट कार्डला UPI शी लिंक केल्याने या माध्यमातून देखील प्रचंड संख्येने आर्थिक व्यवहार होत असल्याचे दिसून आले आहे. एप्रिल 2023 मध्ये क्रेडीट कार्डच्या माध्यमातून 81 कोटी ऑनलाईन आर्थिक व्यवहारांची नोंद झाली. याच महिन्यात डेबिट कार्डमधून 16 कोटी व्यवहार झाले.