Cotten Production In India: कापूस हे नगदी पिक आहे. भारतात त्यास पाढरं सोनं असंही म्हटलं जातं. कापूस उत्पादनात भारत जगात प्रथम क्रमांकावर होता. तसेच सर्वात मोठा कापूस निर्यातदार असण्याचा मानही भारताकडे होता. मात्र, आता परिस्थिती बदल आहे. चालू वर्षात कापसाचे उत्पादन कमालीचे रोडावणार असल्याचे चिन्ह दिसत आहे. चालू हंगामात देशातील कापूस उत्पादन 19 वर्षांच्या निचांकावर पोहण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
कापूस निर्यात 19 वर्षांच्या निचांकावर
कापूस हे शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचे नगदी पिक आहे. तसेच कापड व्यवसायासाठी प्रमुख कच्चा माल. भारत सर्वाधिक कापसाची निर्यात करतो. मात्र, आता निर्यात 19 वर्षांच्या निचांकावर पोहचण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भारतालाच आता कापूस आयात करण्याची गरज पडू शकते, अशी परिस्थिती आली आहे. कापसाचे उत्पादन कमी झाल्याने कॉटन असोसिएशन ऑफ इंडिया (CAI) ने धोक्याचा इशारा दिला आहे. 2022-23 कापूस हंगामात उत्पादन 4.65 लाख बेल एवढे कमी होऊन 298.35 लाख बेल इतके होईल, असा अंदाज CAI ने वर्तवला आहे.
मराठवाड्यात 40 लाख हेक्टरवरील पिकांचं नुकसान
मार्च महिन्यापासून अवकाळी पावसाने महाराष्ट्रासह इतरही राज्यात थैमान घातले आहे. ऊन पावसाच्या खेळामुळे शेतकरी मात्र, चांगलेच हवालदिल झाले होते. मराठवाड्यात सुमारे 40 लाख हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात कापूस पिकही जमीनदोस्त झाले. पावसाने कापसाच्या गाठींच मोठ्या प्रमाणात नुकसान झालं. शेतीचा खर्च वाढत असताना उत्पादन मात्र, कमी होत आहे.
कापूस निर्यातीला उतरती कळा
केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, भारताचा कापूस निर्यात व्यापार 2,659.25 मिलियन डॉलर इतका होता. त्यात घट होऊन 2022 साली 678.75 मिलियन डॉलरवर आला. तब्बल 74 टक्क्यांची वार्षिक घट यामध्ये दिसून आली आहे. भारताची कापूस निर्यात 19 वर्षांतील सर्वात कमी असेल, असा अंदाज अमेरिकेच्या कृषी मंत्रालयाने वर्तवला आहे.
प्रति हेक्टर उत्पादन वाढीवर भर देण्याची गरज
मागील दहा ते पंधरा वर्षात भारताने कापूस बियाणांच्या नव्या प्रजाती तयार केल्या नाहीत. तसेच कृषी उत्पादन घेण्याच्या पद्धतीतही बदल केले नाहीत, प्रति हेक्टर कापसाचे उत्पादन वाढवण्यावर भरी दिला पाहिजे. त्यासाठी सरकारी पातळीवरून धोरण तयार करायला हवे. मात्र, तरीही पुढील दोन ते तीन वर्ष परिस्थिती बदलणार नाही, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवला जात आहे.