Corporate Bond: कॉर्पोरेट कंपन्यांनी एप्रिल महिन्यात रोख्यांद्वारे कमी निधी गोळा केला. मार्च महिन्यामध्ये कॉर्पोरेट बाँड इश्यू करण्याचे प्रमाण जास्त होते. कंपन्यांना निधीची गरज कमी भासल्यामुळे बाँड इश्यू करण्याचे प्रमाण घटले, असे मत जाणकार व्यक्त करत आहेत. मागील काही दिवसांपासून आरबीआयने व्याजदरात मोठी वाढ केली आहे त्यामुळे बाँडमधून मिळणारा परतावाही कमी झाला आहे.
कॉर्पोरेट बाँड्स हे खासगी किंवा सरकारी कंपन्यांकडून निधी उभारणीसाठी जारी केले जातात. निश्चित परतावा देणारे हे गुंतवणुकीचे डेट पर्याय आहेत. मात्र, सर्वसाधारणपणे एप्रिल महिन्यात कॉर्पोरेट कंपन्या तिमाहीचे निकाल जाहीर करतात. त्यामुळे लेखाविषयक कामे झाल्यानंतरच पुढील आर्थिक वर्षात किती रुपयांची गुंतवणूक करायची याचे नियोजन केले जाते. त्यामुळे एप्रिल महिन्यात कंपन्या मोठ्या प्रमाणात निधी उभारत नाहीत, असे जाणकारांचे मत आहे.
मार्च महिन्यातील आकडेवारी
मार्च महिन्यात कॉर्पोरेट बाँडद्वारे कंपन्यांनी 1.16 लाख कोटी रुपये उभारले होते. मात्र, या आकडेवारीशी तुलना करता एप्रिल महिन्यात कंपन्यांनी बाँड पर्यायाद्वारे फक्त 57,032 कोटी रुपये उभारले. प्रामुख्याने कॉर्पोरेट कंपन्या आणि बँकांनी हा निधी बाजारातून उभारला आहे. एप्रिल महिन्यात नव्या बाँड्सची संख्या कमी असल्याने त्या संबंधित व्यवहारही कमी होते.
आर्थिक वर्षातील मार्च हा शेवटचा महिना असतो. मार्च एंडआधी कंपन्यांना नफ्याचे तसेच विक्रीचे लक्ष्य गाठायचे असल्याने जास्त निधीची गरज भासते. त्यामुळे मार्च महिन्यातील बाँड इश्यूचे प्रमाण जास्त दिसते. मात्र, एप्रिल महिन्यात पुन्हा बाजार संथ होतो, असे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मागील वर्षी कोरोनाचा प्रभाव असल्याने बाँड इश्यू करण्याचे प्रमाण एप्रिल 2023 पेक्षाही कमी होते. एप्रिल 2022 मध्ये कॉर्पोरेट रोख्यांद्वारे कंपन्यांनी फक्त 16,359 कोटी रुपये उभारले होते.
कोणत्या कंपन्यांनी सर्वाधिक निधी उभारला?
पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, नाबार्ड, महिंद्रा अँड महिंद्रा फायनान्स सर्व्हिसेस, HDB Financial Services, बजाज फायनान्स अँड हाउसिंग डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन या कंपन्यांनी सर्वाधिक म्हणजे 27,112 कोटी रुपये कॉर्पोरेट बाँड्सद्वारे उभारले.
बाजारातील कॉर्पोरेट बाँडचे मूल्य
आरबीआयच्या पतधोरणानंतर कॉर्पोरेट बाँडचे मूल्य घटल्याचे अर्थतज्ज्ञांचे मत आहे. मार्च महिन्यात तीन वर्ष कालावधीचे रोखे 7.58-7.63 टक्क्यांच्या दरम्यान खरेदी-विक्री होत होते. मात्र, एप्रिलमध्ये हा दर खाली येऊन 7.42-7.48 झाला. तसेच 5 आणि 10 वर्षांच्या बाँडचे मूल्यही घसरले आहे. यापुढे आरबीआय दरवाढ करणार नाही, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. चालू वर्षातील पतधोरण बैठकांमध्ये व्याजदर कपात केली तर बाँडचे बाजारातील मूल्य वाढू शकते, असा अंदाज तज्ज्ञांकडून व्यक्त केला जात आहे.
मे महिन्यात कर्ज स्वस्त होण्याच्या शक्यतेने बाँड इश्यू करण्याचे प्रमाण वाढू शकते, असेही बोलले जात आहे. दरम्यान, व्याजदर कपात जरी केली तरी चालू वर्षात रोख्यांच्या दरात खूप मोठा फरक पडणार नाही. दीर्घकाळात बाँडचे मूल्य वाढेल, असे जाणकारांचे मत आहे.