Infosys Co-Founder Nandan Nilekani: इन्फोसिसचे सह-संपादक नंदन नीलेकणी यांनी इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगमध्ये आयआयटी-बॉम्बे येथून पदवी प्राप्त केली आहे. आयआयटी-बॉम्बे ही देशातील प्रतिष्ठित शैक्षणिक संस्थांपैकी एक आहे. नीलेकणी यांनी याआधी देखील आयआयटी-बॉम्बेला 85 कोटी रुपये देणगी दिली होती. तर आता परत ते 315 कोटी रुपये देणार असल्याची माहिती एका प्रसिध्दीपत्राद्वारे आणि ट्विटरवर देण्यात आली. त्यामुळे नीलेकणी यांनी आतापर्यंत एकूण 400 कोटी रुपये आयआयटी-बॉम्बेला दिले असल्याची चर्चा सर्वत्र सुरु आहे.
Table of contents [Show]
नंदन नीलेकणी बाबत माहिती
इन्फोसिसचे सह-संपादक नंदन नीलेकणी यांचा जन्म 2 जून 1955 रोजी बंगळूर येथे झाला. त्यांचे शिक्षण कर्नाटकच्या धारवाड येथील बिशप कॉटन बॉईज स्कूल आणि सेंट जोसेफ हायस्कूल,कर्नाटक पीयू कॉलेज येथे झाले. त्यानंतर त्यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी बॉम्बे, मुंबई येथून इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंगची पदवी घेतली. नीलेकणी मार्च २००२ मध्ये इन्फोसिसचे मुख्य कार्यकारी अधिकारी बनले आणि एप्रिल २००७ पर्यंत कंपनीचे CEO म्हणून कार्यरत होते.
नंदन नीलेकणी हे 2009 ते 2014 या कालावधीत कॅबिनेट मंत्री पदावर भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणाचे (UIDAI) संस्थापक अध्यक्ष होते. UIDAI चे अध्यक्ष या नात्याने त्यांनी भारतात बहुउद्देशीय राष्ट्रीय ओळखपत्र किंवा युनिक आयडेंटिटी कार्ड (UID कार्ड)प्रकल्प राबविले. तेव्हा पासून बायोमेट्रिक प्रणाली भारतात सुरु झाली. नीलेकणी हे नवी दिल्लीस्थित नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च (NCAER), या आर्थिक संशोधन थिंक टँकच्या प्रशासकीय मंडळाचे अध्यक्ष आहेत. तर नीलेकणी यांनी आतापर्यंत 12 स्टार्ट-अप्समध्ये गुंतवणूक केली आहे.
काय आहे सामंजस्य करार
प्राध्यापक शुभाशिष चौधरी हे आयआयटी-बॉम्बेचे संचालक आहेत. नंदन नीलेकणी आणि प्राध्यापक शुभाशिष चौधरी यांच्यात या देणगीसाठी बेंगळुरू येथे एक सामंजस्य करार (MoU) करण्यात आला. या देणगीमुळे IIT बॉम्बेमध्ये जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधांना चालना देण्यासाठी, अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञानाच्या उदयोन्मुख क्षेत्रांमध्ये संशोधनास प्रोत्साहन देण्यासाठी आणि एक समृद्ध तंत्रज्ञान स्टार्टअप इकोसिस्टमचे तयार करण्यास मदत होईल, असे प्रसिध्दीपत्रकात म्हटले आहे.
नीलेकणी यांना शिक्षणाची जाणीव
'आयआयटी-बॉम्बे माझ्या आयुष्याचा आधारस्तंभ आहे, यामुळे माझ्या सुरुवातीच्या आयुष्याला आकार मिळाला आणि माझ्या शैक्षणिक प्रवासाची पायाभरणी झाली. ही देणगी केवळ आर्थिक योगदानापेक्षाही अधिक आहे; ही त्या ठिकाणाला कृतज्ञता आहे. ज्याने मला खूप काही दिले आहे आणि विद्यार्थ्यांसाठी वचनबद्धता आहे जे उद्याचे आपले जग घडवतील', या आशयाचे ट्विट नंदन नीलेकणी यांनी केले आहे.
आयआयटी-बॉम्बेच्या संचालकांचे मत
‘या देणगीमुळे आयआयटी बॉम्बेच्या विकासाला मोठ्या प्रमाणात गती मिळेल आणि आयआयटी-बॉम्बे जागतिक नेतृत्वाच्या मार्गावर दृढपणे प्रस्थापित होईल. नंदनच्या योगदानामुळे भारतातील विद्यापीठांमध्ये संशोधन आणि विकासाला चालना मिळेलच, सोबतच संशोधन आणि विकासासाठी देणगी देण्यास इतरांनाही प्रोत्साहन मिळेल’, असे मत आयआयटी-बॉम्बेचे संचालक प्राध्यापक शुभाशिष चौधरी यांनी व्यक्त केले.