Check Some Facts Before Investing FD: एफडीवरील वाढलेल्या व्याजामुळे तुम्हीही तुमचे पैसे एफडी स्कीममध्ये गुंतवण्याचा विचार करत असाल, तर ते गुंतवण्याआधी काही गोष्टींचा विचार केला पाहिजे. अनेक लहान फायनान्स बँका त्यांच्या ग्राहकांना एफडीवर अतिशय चांगले व्याजदर देत आहेत. त्याचवेळी, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील बँका त्यांच्या ग्राहकांना उच्च व्याजदर देत आहेत. अनेक बँका 9 टक्क्यांपेक्षा जास्त व्याजदर देत आहेत. परंतु, एफडीवरील वाढते व्याजदर बघून भांबावून जाऊ नका. गुंतवणूक करण्याआधी काही गोष्टी नक्की तपासा.
अनेक लहान फायनान्स बँका त्यांच्या ग्राहकांना एफडी अतिशय चांगले व्याज देत आहेत. त्याचवेळी, खाजगी आणि सरकारी क्षेत्रातील दोन्ही बँका त्यांच्या ग्राहकांना उच्च व्याजदराचा लाभ देत आहेत. जसे की, सूर्योदय स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 9.1 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे आणि युनिटी स्मॉल फायनान्स बँक आपल्या ग्राहकांना 9 टक्के व्याजदराचा लाभ देत आहे.
तज्ज्ञ काय सांगतात?
सामान्यतः जास्त व्याज दर हा उच्च जोखमीशी संबंधित असतो. स्मॉल फायनान्स बँका पारंपरिक आणि मोठ्या बँकांपेक्षा नवीन आणि लहान असल्याने त्यांचे भांडवलीही कमी असतो. या कारणास्तव, अशा बँकांकडून धोका होण्याची शक्यता असते. व्याजदर जितका जास्त असेल तितका तुमच्या गुंतवणुकीवर परतावा जास्त असतो. त्यामुळे, जर व्याजदर इतरांपेक्षा जास्त असेल तर तिथे रिस्क देखील जास्त असते.
विविध ठिकाणी गुंतवणूक करा
गुंतवणूक नेहमी वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवली पाहिजे. वेगवेगळ्या बँका वेगवेगळ्या व्याजदराचा लाभ देतात. तुम्ही तुमचा पैसा कुठे गुंतवला याने काही फरक पडत नाही. विश्वास, सेवा, ऑफर आणि ग्राहक सेवा यावर लक्ष केंद्रित करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. याशिवाय, तुम्हाला बँक ठेव विमा योजनेंतर्गत समाविष्ट आहे की नाही? हे देखील तपासणे आवश्यक आहे, जसे की ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन (DICGC), जी 5 लाखांपर्यंतच्या दाव्यांचा विमा देते. DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) FD गुंतवणूकदारांना अतिरिक्त सुरक्षा प्रदान करते.
तुमचे खाते अनेक वर्षांपासून बँकेत असेल आणि बँक आर्थिक संकटात असेल, तर त्यामुळे तुमची संपूर्ण गुंतवणूक धोक्यात येऊ शकते. तुम्ही तुमचे पैसे वेगवेगळ्या ठिकाणी ठेवल्यास धोका कमी होईल. याशिवाय, कधीकधी असे देखील होते की, इतर बँका तुमच्या बँकेपेक्षा चांगले व्याजदर देतात.
मॅच्युरिटीबाबत जाणून घ्या
काहीवेळा तुम्हाला मुदतपूर्तीपूर्वीच एफडीमधून (Pre-Mature FD) पैसे काढावे लागले तर त्यावर किती दंड आकारला जाऊ शकतो, याची माहिती ही घेतली पाहिजे. बँक एफडीमध्ये पैसे गुंतवण्यापूर्वी, तुम्ही बँकेची आर्थिक स्थिती देखील तपासून घेतली पाहिजे. ज्या बँकेत तुम्हाला पैसे जमा करायचे असतील. त्या बँकेचे भांडवल प्रमाण, नफा, तरलता (Liquidity) आणि व्यवस्थापन तपासले पाहिजे. तसेच बँकेचे क्रेडिट रेटिंगही तपासले पाहिजे.
दरम्यान, महागाई नियंत्रणात राहिल्यास रेपो दरही खाली येण्याची अपेक्षा आहे. सध्या रेपो दरामुळे FD वर जास्त व्याज मिळत असल्याने, FD योजनांमध्ये गुंतवणूक करण्याचा हा सर्वोत्तम काळ असू शकतो.