वाढलेल्या वीजबिलामुळे जर तुम्ही हैराण असाल आणि पारंपारिक ऊर्जास्रोतांचा वापर करून घरच्या घरी वीजनिर्मिती करण्याचा जर तुम्ही विचार करत असाल तर ही बातमी खास तुमच्यासाठी आहे. तुम्ही काही ग्रामीण भागात घरांच्या गच्चीवर काही लोकांनी छोटीशी पवनचक्की लावलेली पाहिली असेल. आकाराने लहान असलेली ही पवनचक्की तुमच्या संपूर्ण घरासाठी आवश्यक असलेली वीज निर्मिती करू शकते हे तुम्हांला माहिती आहे का? जर याबद्दल तुम्हांला माहिती नसेल तर हा लेख जरूर वाचा.
सध्या वाढत्या महागाईने सगळेच हैराण आहेत. महागाईशी दोन हात करण्यासाठी आणि पैशांची बचत करण्यासाठी आपण सगळेच वेगवगेळ्या गोष्टींचा अवलंब करत असतो. वाढत्या वीजबिलाला पर्याय म्हणून लोक आता घरावर पवनचक्की बसवू लागले आहेत.नेहमीच्या आकारतील पवनचक्की तुम्हांला माहिती असेलच, परंतु वेगवगेळ्या आकारातल्या पवनचक्की देखील आता बाजारात उपलब्ध आहे. एकदा की पवनचक्की घरावर बसवली की निरंतर वीजनिर्मितीचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध असणार आहे. आता तुम्हांला प्रश्न पडला असेल की ही पवनचक्की लावायची कशी? तिला खर्च किती येतो आणि वीजनिर्मिती कशी होते? चला तर जाणून घेऊयात याबद्दल सविस्तर माहिती.
ट्यूलिप टर्बाइनचा वाढता वापर
सध्या ट्यूलिप टर्बाइन मोठ्या प्रमाणात लोक वापरत आहेत. हवा खेळती राहते अशा भागांमध्ये म्हणजेच गच्चीवर, शेतात तुम्ही हे टर्बाइन लावू शकता. टर्बाइन म्हटल्यावर तुमच्या डोळ्यासमोर भलेमोठे मशीन येत असेल तर जरा थांबा. तुमच्या घराच्या गच्चीवर एकदम कमी जागेत, आणि तुलनेने कमी खर्चात तुम्ही हे टर्बाइन लावू शकता. ट्युलिप टर्बाइन हा टर्बाइनचा परवडणारा असा एक प्रकार आहे जो सध्या युरोपियन देशांत मोठ्या प्रमाणात वापरला जात आहे. महिंद्रा अँड महिंद्राचे अध्यक्ष आनंद महिंद्रा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरून ट्युलिप टर्बाइनचा एक व्हिडिओ शेअर केला होता. भारतात देखील असे टर्बाइन वापरून लोकांना घरच्या घरी वीजनिर्मिती करता येईल असे आनंद महिंद्रा यांनी म्हटले होते.
I often wondered how massive allocations of land (and air, given their height!) for traditional turbines would be sustainable? Multiple forms of generation should be welcomed. For India, tulip turbines are ideal: lower cost, lower space & useful in both urban & rural settings. pic.twitter.com/j6ychzdGmK
— anand mahindra (@anandmahindra) October 21, 2022
कसे करते कार्य?
ट्यूलिप टर्बाइन हे आकाराने लहान आणि खर्चाच्या दृष्टीने देखील परवडणारे असतात. तुम्ही तुमच्या छतावर हे लावू शकता. अगदी सोसायटीची पार्किंगची जागा, कार्यालये, शॉपिंग मॉल्स इत्यादी ठिकाणी देखील तुम्ही हे लावू शकता. वीज निर्माण करण्यासाठी, या टर्बाइनला 2 पंख असतात जे वाऱ्यामुळे टर्बाइन फिरवतात. खरे तर हे ट्युलिप टर्बाइन तुलनेने कमी खर्चात आणि कमी वेळेत परवडणारी अशी हरित ऊर्जा निर्माण करते आणि त्यावर वर्षभर अतिरिक्त खर्च करण्याची देखील गरज नाहीये. भारतात एका ट्यूलिप टर्बाइनची किंमत 80 ते 85 हजार रुपये इतकी आहे. याद्वारे 600 वॅट ते 10 किलो वॅट वीज निर्मिती केली जावू शकते. एकदा की हे टर्बाइन लावले की आयुष्यभर तुम्हांला महागड्या वीजबिलापासून दिलासा मिळू शकतो.
कशी साठवली जाते वीज
ट्युलिप टर्बाइनचे कनेक्शन त्याला जोडलेल्या बॅटरीमध्ये दिलेले असते. जेव्हा वाहत्या वाऱ्याने टर्बाइन फिरते तेव्हा त्यातून विजेची निर्मिती होते. ही वीज बॅटरीमध्ये साठवून ठेवली जाते आणि आपापल्या गरजेनुसार ती आपल्याला वापरता येते.