दहावी-बारावीचे निकाल लागले आहेत. विद्यार्थी आता नवीन अभ्यासक्रमासाठी कुठे प्रवेश घ्यावा याच्या गडबडीत आहेत. अशातच व्हाट्सॲपवर सध्या मोफत लॅपटॉप योजनेचा एक बनावट मेसेज चांगलाच व्हायरल झाला आहे. थेट भारत सरकारच्या नावाने आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो वापरून हा स्कॅम सुरु आहे. तुम्हाला देखील अशा आशयाचा एखादा मेसेज व्हाट्सॲपवर आला असेल आणि तुम्हाला कुठली तरी लिंक पाठवून त्यावर माहिती भरायला सांगितली असेल तर सावधान! यामुळे तुमचे नुकसान होऊ शकते हे लक्षात असू द्या. जाणून घेऊयात, हा स्कॅम नक्की काय आहे आणि त्यातून तुमचे कसे नुकसान होऊ शकते ते.
स्कॅमर लोक इंटरनेटवर एक नवीन घोटाळा करतायेत. हे स्कॅमर लोकांना व्हाट्सॲपवर, भारत सरकार विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे अशा आशयाचा एक मेसेज पाठवत आहेत. तसेच तुम्ही शासनाच्या अधिकृत वेबसाइटवर नोंदणी करून या ऑफरचा लाभ घेऊ शकतात असे देखील सांगितले जात आहे, यासाठी एक लिंक देखील नागरिकांना मेसेजद्वारे पाठवली जात आहे. अनेक नागरिकांनी हा मेसेज खरा आहे आणि सरकारची ही योजना देखील खरी आहे असे समजून स्वतः माहिती भरली आहे आणि मेसेज व्हायरल देखील केला आहे.
Claim: The Government Of India is offering free laptops to youth under the Prime Minister Free Laptop Scheme 2023 #PIBFactCheck
— PIB Fact Check (@PIBFactCheck) May 28, 2023
▪️ The notice is #FAKE
▪️ No such scheme is being run by the @EduMinOfIndia, GOI pic.twitter.com/QEVq1OdybO
परंतु, PIB फॅक्ट चेकने या मेसेजची पडताळणी केली असून, अशी कुठलीही योजना भारत सरकारने सुरु केली नसल्याचे म्हटले आहे आणि नागरिकांना सल्ला दिला आहे की अशा घोटाळ्याला बळी पडू नका व तुमची खासगी माहिती कुणालाही देऊ नका.
मोफत लॅपटॉप योजना खोटी
पंतप्रधान मोफत लॅपटॉप योजना 2023-24 चे पोस्टर सोशल मिडीयावर चांगलेच व्हायरल होत आहे. यात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा फोटो देखील वापरला जातो आहे. पीआयबी फॅक्ट चेकने याबाबत स्पष्टीकरण देताना म्हटले आहे की, हे पोस्टर बनावट असून अशी कुठलीही योजना सरकारने सुरु केलेली नाही. तसेच कुठल्याही प्रकारची नोंदणी सरकारद्वारे केली जात नाहीये.
होऊ शकते नुकसान!
स्कॅमरकडून आलेला कुठलाही मेसेज वाचताना विशेष खबरदारी घेतली पाहिजे. सरकारची कुठलीही कल्याणकारी योजना ही संबंधित विभागातर्फे जाहीर केली जाते हे लक्षात असू द्या. शासनाच्या योजनांबद्दल सविस्तर माहिती घ्यायची असेल तर संबंधित मंत्रालयाच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन योजनेची माहिती घ्यावी. स्कॅम मेसेजवर विश्वास ठेवून जर तुम्ही त्यांनी दिलेली लिंक ओपन केली आणि त्यात माहिती भरली तर स्कॅमरकडे तुमची खासगी माहिती जमा होते. यात आधार कार्ड, पत्ता, शाळेचे नाव आदी माहिती विचारलेली असते. या माहितीचा गैरवापर सायबर चोर आर्थिक गुन्ह्यात देखील करू शकतात हे लक्षात असू द्या.