मागील सहा महिन्यांपासून तंत्रज्ञान क्षेत्रात धुमाकूळ घालणारे OpenAI चे ChatGPT अॅप अखेर भारतात अॅंड्रॉइडवर मोफत उपलब्ध झाले आहे. अॅंड्रॉइड 6.0 या व्हर्जनमधील स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरुन OpenAI ChatGPT अॅप मोफत डाऊनलोड करता येईल. मात्र जून महिन्यात ChatGPT वापर करणाऱ्या युजर्सच्या संख्येत घसरण झाल्याने कंपनीने अॅंड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ChatGPT अॅप दाखल केले आहे.
OpenAI कंपनीने नोव्हेंबर 2022 मध्ये ChatGPT तंत्रज्ञान विकसित केले होते. त्यांनतर ChatGPT वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली होती. लॉंच केल्यानंतर जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्यात सरासरी 10 कोटी युजर्सनी ChatGPTचा वापर केला होता.
अमेरिका, भारत, बांग्लादेश आणि ब्राझिल या देशांमधील अॅंड्राइड फोनधारकांना आता ChatGPT अॅप डाऊनलोड करता येणार आहे. मे महिन्यापासून ChatGPT अॅप अॅपल iOS वर उपलब्ध आहे. 4 जुलै 2023 पर्यंत अॅपल iOS 17 मिलियन डाऊनलोड्स करण्यात आले आहेत. अॅंड्रॉइड 6.0 या व्हर्जनमधील स्मार्टफोनमध्ये प्ले स्टोअरवरुन OpenAI ChatGPT अॅप डाऊनलोड करता येईल. अॅंड्रॉइड फोनवर दाखल झाल्याने ChatGPT वापरकर्त्यांच्या संख्येत प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे.
OpenAI कंपनीने कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ChatGPT हे टूल विकसित केले आहे. कृत्रिम बुद्धीमत्तेतले (Artificial Intelligence) आजवरच सर्वात प्रगत तंत्रज्ञान म्हणून ChatGPT कडे पाहिले जाते. ChatGPTला जगभरातून उदंड प्रतिसाद मिळाला आहे. त्यामुळे मायक्रोसॉफ्ट आणि गुगलकडून कृत्रिम बुद्धीमत्तेत बिलियन डॉलर्सची गुंतवणूक केली आहे.
संकल्पनांना शब्दबद्ध करणारे कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित ChatGPT लोकप्रिय टूल आहे. मायक्रोसॉफ्टचे बिंग, गुगलचे Bard chatbot हे दोन टूल्स ChatGPTशी स्पर्धा करत आहेत.
OpenAI करणार बक्कळ कमाई
ChatGPT अॅंड्रॉइड आणि अॅपल iOS उपलब्ध केल्याने चालू वर्षात OpenAI कंपनी 200 मिलियन डॉलर्सचे (भारतीय चलनात 1644 कोटी ) उत्पन्न मिळण्याची शक्यता आहे. मे महिन्याच्या तुलनेत जून महिन्या डेक्सटॉप आणि मोबाईलवरुन ChatGPT वेबला भेट देणाऱ्या युजर्सच्या संख्येत 9.7% घसरण झाली होती. याशिवाय ChatGPT साठी वेबसाईटवर युजर्सचे वेळ खर्च करण्याचे प्रमाण 8.5% कमी झाले होते. महसुली उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी कंपनीला अॅंड्रॉइड प्लॅटफॉर्मवर ChatGPT अॅप दाखल करावे लागले.