भारतातील प्रत्येक प्रदेश विविधता आणि सौंदर्याने नटलेला आहे. याच विविधतेत एकतेचे प्रचिती नवीन बांधण्यात आलेल्या संसद भवनाला यावी, यासाठी तिथे लागणारे अनेक साहित्य हे देशातील विविध भागातून मागविण्यात आले आहे. नवीन संसद भवनाच्या बांधकामात मिर्झापूरचे गालीचे (कार्पेट), त्रिपुरातील बांबूपासून तयार केलेल्या टाइल्स आणि राजस्थान येथे तयार करण्यात आलेली दगडी नक्षीकाम करण्यात आलेली आहे. त्यामुळेच संसद भवनाचा व्हिडिओ शेअर करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, नवीन संसद भवन प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल अशी आहे.
Table of contents [Show]
सागवान लाकूड ते संगमरवर असा प्रवास
इमारतीत वापरलेले सागवान लाकूड हे महाराष्ट्रातील नागपूर येथून आले होते, तर लाल आणि पांढरा वाळूचा खडक राजस्थानमधील सरमखुरा येथून आला होता. तसेच उदयपूर येथून केशरी आणि हिरवा दगड, अजमेरजवळील लाखा येथून लाल ग्रॅनाइट आणि अंबाजी राजस्थान येथून पांढरा संगमरवर आणण्यात आला आहे.
मुंबईतील फर्निचरला पसंती
लोकसभा आणि राज्यसभेच्या चेंबर्समधील फॉल्स सिलिंगसाठी लागणारी स्टीलची फ्रेम दमण आणि दीव या केंद्रशासित प्रदेशातून आणली गेली होती. नवीन इमारतीतील फर्निचर मुंबईत तयार करण्यात आले होते. इमारतीवर लावण्यात आलेली दगडी जाळी राजस्थानमधील राजनगरमध्ये आणि उत्तर प्रदेशातील नोएडा येथे तयार करण्यात आली होती.
इंदूर येथून खरेदी केले अशोक चक्र
अशोक चिन्हासाठी लागणारे साहित्य महाराष्ट्रातील औरंगाबाद आणि राजस्थानमधील जयपूर येथून आणण्यात आले होते. तर लोकसभा आणि राज्यसभेच्या सभागृहांच्या भव्य भिंती आणि संसद भवनाच्या बाहेरील भागासाठी लागणारे अशोक चक्र मध्य प्रदेशातील इंदूर येथून खरेदी करण्यात आले होते.
पर्यावरणपूरक एम-वाळूचा वापर
दगडी कोरीव काम अबू रोड आणि उदयपूर येथील शिल्पकारांनी केले होते आणि दगड राजस्थानमधील कोटपूतली येथून आले होते. हरियाणातील चरखी दादरी येथील उत्पादित वाळूचा वापर (एम-वाळू) नवीन संसद भवनातील बांधकाम करतांना, ठोस मिश्रण तयार करण्यासाठी केला गेला. एम-वाळू पर्यावरणपूरक मानली जाते. कारण ती नदीचे पात्र खोदून नव्हे. मोठमोठे कठीण दगड किंवा ग्रॅनाइट क्रश करून तयार केली जाते. बांधकामात वापरल्या गेलेल्या फ्लाय अॅशच्या विटा हरियाणा आणि उत्तर प्रदेशमधून आणल्या गेल्या होत्या. या बांधकामात वापरलेले पितळी सामग्रीसाठी आधीच तयार केलेले साचे हे गुजरातमधील अहमदाबाद येथून आणले होते.
प्रकल्पाचा एकूण खर्च 1289 कोटी
या संसद भवनाच्या बांधकामाचा करार टाटा कंपनीकडे होता, जो केंद्राच्या सेंट्रल व्हिस्टा पुनर्विकास योजनांचा एक भाग होता. टाटा प्रोजेक्ट्सने लार्सन अँड टुब्रोला मागे टाकत 861.9 कोटी रुपयांमध्ये प्रकल्प पूर्ण करण्याची ऑफर देऊन, ते काम विकत घेतले होते. अहमदाबाद स्थित एचसीपी डिझाइन, प्लॅनिंग आणि मॅनेजमेंट साठी प्रसिद्ध असलेले वास्तुविशारद तज्ज्ञ बिमल पटेल यांच्या नेतृत्वाखाली संसदेच्या नवीन इमारतीची रचना करण्यात आली आहे.
डिसेंबर 2020 साली या संसद निर्माण प्रकल्पाचे उद्घाटन झाले होते. तेव्हा अंदाजित खर्च 977 कोटी इतका होता. मात्र, एक वर्षानंतर त्यामध्ये 282 कोटींच्या अतिरिक्त खर्चाची भर पडली. ही रक्कम एकूण बजेटच्या 29% इतकी जास्त होती. त्यामुळे प्रकल्पाचा एकूण खर्च 1289 कोटींच्या दरम्यान झाल्याची माहिती आहे. इमारतीचे संपूर्ण क्षेत्रफळ 98000 चौरस मीटर इतके असून; अनेक अत्याधुनिक सुविधांनी युक्त अशी ही नवी इमारत आहे. या नव्या इमारतीवर देशाचा गौरवशाली वारसा दाखवण्यासाठी शिल्पे कोरण्यात आली आहेत.