ग्रामीण भारतात आजही शेतकऱ्याचा मुख्य आधार पशुधन आहे. ज्याठिकाणी अद्याप यांत्रिकीपद्धतीने शेती केली जात नाही, अशा शेतकऱ्यांसाठी गायीगुरे लाखमोलाची आहेत. त्यामुळे पशुधनाचा विमा असणे शेतकऱ्यासाठी फायदेशीर ठरतो. नैसर्गिक आपत्तीतमध्ये पशुधन गमावल्यास विमा भरपाईने शेतकऱ्याचे नुकसान कमी होते.
कृषिआधारित अर्थव्यवस्था टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडून शेतकऱ्यांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. त्यापैकी एक गुरांसाठी विमा योजना आहे.विशेषत: ज्यांची शेती गुरांवर अवलंबून आहे किंवा ज्यांच्यासाठी गुरे उत्पन्नाचे साधन आहे अशा अल्पभूधारक शेतकऱ्यांसाठी कॅटल इन्शुरन्स फायदेशीर ठरत आहे. सरकारच्या कृषि खात्याबरोबरच काही खासगी जनरल इन्शुरन्स कंपन्यांकडून गुरांसाठी विमा पॉलिसी इश्यू केली जाते.
कॅटल इन्शुरन्स अर्थात पशुधन विमा योजनेत गुराचा मृत्यू झाल्यास किंवा त्याला अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला विमा भरपाई दिली जाते. नवीन गाय, म्हैस, बैल खरेदी करण्यासाठी शेतकऱ्याला हजारो रुपये खर्च करावे लागतात. शिवाय गुरांचा सांभाळ करणे देखील खर्चिक आहे. अशावेळी जनावर दगावल्यास शेतकरी कर्जबाजारी होऊ शकतो. हे टाळण्यासाठी प्रत्येक शेतकऱ्याने गुरांचा विमा काढणे आवश्यक आहे.
विमा कंपन्यांकडून गुरांसाठी दोन प्रकारच्या विमा पॉलिसी इश्यू केल्या जातात. एका पॉलिसीमध्ये गुराचा मृत्यू झाल्यास भरपाई मिळते. दुसऱ्या पॉलिसीमध्ये गुराला कायमचे अपंगत्व आल्यास शेतकऱ्याला विमा भरपाई दिली जाते. भूकंप, अतिवृष्टी, वादळ, वीज कोसळणे, रोगाच्या प्रादुर्भावाने जनावर दगावले, उपचारांदरम्यान मृत्यू झाल्यास विमा भरपाई दिली जाते.
विमा पॉलिसीसाठी गुरांचे वय 2 वर्षांपासून 12 वर्ष या दरम्यान असणे आवश्यक आहे. गाय, वासरु, बैल, म्हैस अशा जनावरांना विमा दिला जातो. मात्र शेतकऱ्याकडून देखील विमा घेतलेल्या जनावरांची देखभाल करणे तितकेच महत्वाचे आहे. त्यांना वेळोवेळी पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी करणे, जनावरांचे लसीकरण करणे त्याचा तपशिल ठेवणे आवश्यक आहे अन्यथा विमा कंपन्यांकडून विमा दावा नाकारला जाऊ शकतो.
विम्याचा प्रीमियम हा जनावराचे वय आणि त्याचे बाजार मूल्य यातून ठरवला जातो. हे प्रमाण 2 ते 4% इतके असते. पशुधन विमा पॉलिसी किमान 12 महिन्यांसाठी इश्यू केली जाते. काही योजनांमध्ये तो 32 महिन्यांसाठी देखील दिला जातो.
कोणत्या कंपन्यांकडून मिळेल कॅटल इन्शुरन्स
सध्या एसबीआय जनरल, ओरिएंटल इन्शुरन्स, टाटा एआयजी, आयसीआयसीआय लुंबार्ड, रिलायन्स जनरल इन्शुरन्स आणि एचडीएफसी अर्गो या कंपन्यांकडून कॅटल इन्शुरन्स दिला जातो. विमा नियामकानुसार पशुधन विम्याचा दावा 30 दिवासांत निकाली काढणे कंपन्यांसाठी बंधनकारक आहे.