गेल्या काही महिन्यांपासून आपल्या आदेशात सायबर घोटाळे मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. बहुतांश घोटाळे हे ऑनलाइन व्यवहार करताना घडताना दिसत आहेत. तुम्ही देखील अनोळखी व्यक्तींशी आर्थिक व्यवहार करत असाल तर सावधान! कारण इंस्टाग्रामवरून आयफोन खरेदी करणे एका युवकाला चांगलेच महागात पडले आहे.
काय आहे प्रकरण?
अहमदाबादमध्ये राहणाऱ्या एका युवकासोबत हा प्रसंग घडला आहे. या युवकाला इंस्टाग्रामवर एका अनोळखी व्यक्तीचा मेसेज आला. त्यात लिहिले होते की केवळ 3 हजार रुपयांमध्ये तुम्हांला iPhone 14 दिला जाणार आहे. लाखभर रुपयांचा मोबाईल केवळ 3 हजार रुपयात मिळेल म्हणून हा युवक चांगलाच खुश झाला होता. समोरील व्यक्तीने त्याला UPI पेमेंट करण्यासाठी सांगितले. मोबाईलच्या आमिषापोटी या युवकाने देखील 3 हजार रुपये त्याच्या खात्यावर जमा केले.
नंतर काय घडलं?
पैसे भरल्यानंतर आपल्याला लवकरच iPhone 14 मिळेल याची वाट बघत बसलेल्या युवकाला दुसऱ्या दिवशी स्कॅमरने पुन्हा संपर्क साधला आणि तुमचा मोबाईल तुम्हांला लवकर मिळेल याची खात्री दिली. तसेच मोबाईल फोन सध्या सुरत एयरपोर्टवर पोहोचला असून, डिलिव्हरीसाठी आणखी 8 हजार रुपये द्यावे लागतील असे त्याला सांगितले. तरुणाला विश्वासात घेतल्यामुळे त्याने देखील स्कॅमरच्या म्हणण्यावर विश्वास ठेवला आणि लागलीच 8 हजार रुपयांचे UPI पेमेंट केले. सोबतच बँकेचे तपशील देखील स्कॅमरला दिले.
अनोळखी व्यक्तींशी व्यवहार करू नका!
पोलिसांकडून आणि बँकेकडून वारंवार सांगितले जात असते की अनोळखी व्यक्तींना तुमच्या बँकेचे तपशील देत जाऊ नका. तसेच ऑनलाईन व्यवहार करताना विशेष खबरदारी बाळगली पाहिजे. कुठल्याही अमिषाला बळी पासून स्वतःचे नुकसान टाळले पाहिजे. तसेच अशाप्रकारची फसवणूक झाल्यास लागलीच नजीकच्या पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवून बँकेला सूचित केले पाहिजे.