शेअर बाजारात धडकलेल्या लाटेने गुंतवणूकदारांना मालामाल केले आहे. त्याचबरोबर सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल देखील विक्रमी पातळीवर गेले आहे. आज सोमवारी सेन्सेक्समध्ये 529 अंकांची वाढ झाली. या तेजीने बीएसईवरील नोंदणीकृत कंपन्यांचे बाजार भांडवल 303.59 लाख कोटींवर गेले आहे.
पहिल्या तिमाहीतील दमदार निकाल आणि अर्थव्यवस्थेची घोडदौड यामुळे शेअर बाजारात मागील महिनाभरापासून तेजीचे वारे वाहत आहेत. आज सकाळपासून बाजारात गुंतवणूकदारांनी चौफेर खरेदीचा सपाटा लावला होता.
इंट्राडेमध्ये मुंबई शेअर बाजाराच्या सेन्सेक्सने 595.31 अंकांची झेप घेत 66656.21 अंकांचा नवा उच्चांकी स्तर गाठला होता. दिवसअखेर तो 529.03 अंकांच्या तेजीसह 66589.93 अंकांवर स्थिरावला. सेन्सेक्सचा आजवरची ही उच्चांकी पातळी आहे. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी निर्देशांक 146.95 अंकांच्या तेजीसह 18711.45 अंकांवर बंद झाला. निफ्टीसुद्धा सध्या रेकॉर्ड पातळीवर ट्रेड करत आहे.
या तेजीनंतर बीएसईवर सूचीबद्ध कंपन्यांची मार्केट कॅप प्रंचड वाढली आहे. बीएसईवरील सूचीबद्ध कंपन्यांचे बाजार भांडवल 30359528.96 कोटी इतकी वाढली. बीएसईवरील कंपन्यांचे बाजार भांडवल रेकॉर्ड पातळीवर गेले आहे.
आजच्या सत्रात बँकेक्समध्ये 1.45% वाढ झाली. त्याशिवाय फायनान्शिअल सर्व्हिसेस निर्देशांक 1.11%, हेल्थकेअर 0.81%, कमॉडिटीज 0.72%, एनर्जी 0.62% आणि ऑईल अॅंड गॅस निर्देशांकात 0.38% वाढ झाली.
बाजारातील हेवीवेट स्टॉक असलेल्या एचडीएफसी बँकेने तिमाही कामगिरीत गुंतवणूकदारांच्या अपेक्षा पूर्ण केल्या आहेत. एचडीएफसी बँकेच्या निकालानंतर इतर कंपन्यांचे निकाल देखील चांगले असतील अशी शक्यता असल्याने बाजारात तेजीचा माहोल असल्याचे कोटक सिक्युरिटीजचे प्रमुख संशोधक श्रीकांत चौहान यांनी सांगितले.
आजच्या सत्रात एसबीआय, एचडीएफसी बँक, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज, टेक महिंद्रा, इंड्सइंड बँक, एशियन पेंट्स या शेअरमध्ये वाढ झाली. टाटा मोटर्स, जेएसडब्ल्यू स्टील, भारती एअरटेल, टायटन या शेअरमध्ये घसरण झाली. स्मॉल कॅप इंडेक्स 0.85% ने वधारला. मिडकॅप इंडेक्समध्ये आज 0.29% वाढ झाली.