विमा जास्तीत जास्त भारतीयांपर्यंत पोहोचवण्यासाठी विमा नियामक आणि विकास मंडळाकडून (IRDAI) विमा सुगम हे सामायिक व्यासपीठ विकसित करण्यात आले आहे. यात वेगवेगळ्या कंपन्यांची विमा उत्पादने आणि त्यांची इत्यंभूत माहिती ग्राहकांसाठी उपलब्ध होणार आहे. या माहितीच्याआधारे ग्राहकांना विमा निवडणे सोपे जाईल, असा दावा इर्डाकडून करण्यात आला आहे.
सध्या विमा क्षेत्रात अनेक कंपन्यांना अॅग्रीगेटर्स म्हणून कार्यरत आहेत. पॉलिसीबझार, पॉलिसीएक्स सारख्या कंपन्यांच्या वेबपोर्टलवर विमा उत्पादने, त्यांची किंमत, रेटिंग्ज, फायदे-तोटे यांची तुलना ग्राहकांसमोर सादर केली जाते. यातून ग्राहक ऑनलाईन विमा खरेदी करु शकतो. यात मध्यस्थ म्हणून या कंपन्यांना कमिशन मिळते.
इन्शुरन्स अॅग्रीगेटर्सला मिळणारा प्रतिसाद आणि या मंचावरुन होणारी विमा उत्पादनांची विक्री यात लक्षणीय वाढ झाली आहे. त्यामुळेच विमा नियामकाने देखील या क्षेत्रात स्वत:चे व्यासपीठ सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.
विमा सुगम हा ई-कॉमर्स कंपन्या अॅमेझॉन, नायका, मायंत्रा सारख्या कंपन्यांच्या पोर्टलप्रमाणे आहे. यात नोंदणीकृत विमा कंपन्या जसे की एलआयसी, आयसीआयसीआय प्रुडेंशिअल, एसबीआय लाईफ, पीएनबी मेटलाईफ, कोटक लाईफ इन्शुरन्स सारख्या कंपन्यांची विमा उत्पादने आणि त्यांची माहिती पोर्टलवर उपलब्ध आहे.
विमा सुगम पोर्टलवर लाईफ इन्शुरन्स, टर्म इन्शुरन्स, चाईल्ड प्लान्स, इन्व्हेस्टमेंट प्लान्स, पेन्शन प्लान्स, युलिप प्लान्स या विषयी सविस्तर माहिती मिळेल. विमा उत्पादनांची तुलना करुन ग्राहकाला विमा निवडणे सोपे जाणार आहे.
ग्राहकांना विमा सुगमचा काय फायदा
विमा सुगम हे विमा क्षेत्रातील प्रत्येक घटकासाठी एकाच मंचावर माहिती आणि उत्पादनांची विक्री करणारे ई मार्केटप्लेस आहे. ग्राहकांना विमा सुगमवर लाईफ इन्शुरन्स आणि जनरल इन्शुरन्स सवलतीच्या प्रीमियममध्ये थेट खरेदी करता येईल. ग्राहकांना विमा पोर्टेबिलिटी करण्याचा पर्याय देखील या मंचावर उपलब्ध आहे. विमा दावा करण्याची ऑनलाईन प्रोसिजर विमा सुगममधून करता येऊ शकते. याशिवाय अनेक फायदे विमा सुगम वेबपोर्टलवर मिळवता येतील.