ग्राहकांना बँका विविध सेवा देत असतात. त्यात नेट बँकिंग, एसएमएस सेवा, एटीएम सेवा आदींचा समावेश असतो. याशिवाय काही बँका खात्यात किमान शिल्लक नसल्यास ग्राहकांकडून शुल्क आकारतात. या सर्व सेवाशुल्कांचा विचार केल्यास गेल्या वर्षभरात तब्बल 35 हजार कोटी रुपये आकारले आहेत. ही माहिती खुद्द अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी राज्यसभेत विचारलेल्या एका प्रश्नाचे लेखी उत्तर देताना दिली आहे.
मुख्य पाच बँका!
अर्थ राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी दिलेल्या लेखी उत्तरात ग्राहकांकडून सेवाशुल्क आकारणाऱ्या बँकांची नावे देखील जाहीर करण्यात आली आहेत.यात ॲक्सिस बँक, एचडीएफसी बँक, इंडसइंड बँक, आयसीआयसीआय बँक यांचा समावेश आहे. या बँकांची खातेदार संख्या देखील अधिक असल्याने खातेदारांकडून शुल्क आकारणी देखील मोठ्या प्रमाणात करण्यात आली आहे.
शुल्क वसुलीचा तपशील
कोणत्या सेवांसाठी किती पैसे आकारले गेले याचा तपशील देखील अर्थराज्यमंत्री डॉ. कराड यांनी दिला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार अतिरिक्त एटीएम वापरातून 8000 कोटी रुपये ग्राहकांकडून आकारण्यात आले आहेत.
यासोबतच ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यात बँकांनी ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा कमी रक्कम ठेवल्यामुळे त्यांच्याकडून बँकांनी सुमारे 21000 कोटी रुपये आकारले आहेत. तर ग्राहकांना दिल्या जाणाऱ्या संदेश सुविधेपोटी त्यांच्याकडून 6000 कोटींचे शुल्क आकारण्यात आले आहे. एकूण शुल्कापैकी खात्यात किमान शिल्लक नसल्यामुळे ग्राहकांकडून आकारलेले शुल्क सर्वाधिक आहे.
दंडाची रक्कम वेगवेगळी
सर्व बँकांची दंडाची रक्कम ही वेगवगेळ्या कारणांसाठी वेगवेगळी आहे. ग्राहकांनी त्यांच्या बँक खात्यात सरासरी मासिक शिल्लक किती ठेवावी याचे नियम आणि त्यावर आकारला जाणारा दंड देखील वेगवेगळा आहे. खाते प्रकारानुसार आणि स्थानानुसार यात बदल होत असतात.
एटीएमच्या वापराबाबत देखील वेगवगेळ्या बँकांचा वेगवेगळा नियम आहे. ग्राहकांना त्यांच्या बँकेच्या ATM मध्ये दरमहा पाचवेळा मोफत पैसे काढता येतात, त्यांनतर प्रत्येक व्यवहारावर 21 रुपये शुल्क आकारले जाते.
यासोबतच बँका खातेदारांना त्यांच्या खात्याशी संबंधित माहिती पाठवण्यासाठी एसएमएस सेवा प्रदान करतात. या सेवा देखील सशुल्क असतात. बँकांकडून आकारले जाणारे हे शुल्क बँकेनुसार वेगवेगळे असतात. खाते सुरु करताना जो फॉर्म ग्राहकांना दिला जातो त्यावर यासंबंधी सविस्तर माहिती दिलेली असते.