जेव्हापासून ऑनलाइन बँकिंग, युपीआय पेमेंट करण्याची सोय सुरु झाली तेव्हापासून बँकेची काम करताना अनेकांना दिलासा मिळाला. मात्र यात सायबर चोरांची एंट्री झाल्यापासून आर्थिक व्यवहार करताना खूप खबरदारी बाळगावी लागते आहे. ज्येष्ठ नागरिकांच्या आर्थिक फसवणुकीची प्रकरणे रोजच्या आपल्या वाचनात येत असतात. यावर सायबर गुन्हे शाखा तपास करते आणि आरोपीला पकडण्याचा आणि दंडित करण्याचा देखील प्रयत्न करते.
परंतु आता अशा सायबर चोरांना आळा घालण्यासाठी बँकाच एकवटल्या आहेत. ऑनलाइन फसवणूक करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी आणि त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी देशातील सर्व बँका एकत्रित धरीन निश्चिती करणार आहे. याचा भाग म्हणून बँकांनी एका नव्या पोर्टलसाठी रिझर्व्ह बँकेशी चर्चा सुरू केली आहे.
देशभरातील खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील बँका एकत्र येऊन एक नवे पोर्टल विकसित करण्याच्या प्रयत्नात आहे. ज्याद्वारे कुठल्या खात्यातून संशयास्पद व्यवहार झाले, कुठल्या खातेदाराने हे केले अशी सर्व माहिती एकाच ठिकाणी सर्व बँकांना बघता येणार आहे. त्यामुळे सायबर चोरांच्या बँक खात्यावर सर्व बँकांना नजर ठेवता येणार आहे.
ब्लॅक लिस्ट बनवणार
देशभरातील बँकांना या पोर्टलचा ॲक्सेस सर्वच बँकांना दिला जाणार आहे. यावर ज्या खातेदारांकडून संशयास्पदव्यवहार केले जात आहेत, फेरफार करून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात पैसे वळवणारे खातेदार यांची एक ‘ब्लॅक लिस्ट’ बनवली जाणार आहे. या माध्यमातून बँकांना सदर खात्यांच्या हालचालीवर लक्ष ठेवता येणार आहे.
लवकर छडा लावला जाणार
अनेकदा सायबर चोर एका बँकेतून पैसे दुसऱ्या बँकेत वळवतात. प्रत्येक बँकेचे नियम व काम करण्याची पद्धत वेगवेगळी असल्याने सायबर चोरांचा छडा लावणे कठीण होऊन बसते आणि प्रकरणाला विलंब होतो. बँकांनी अशाप्रकारे स्वतंत्र पोर्टल विकसित केल्यास सायबर चोरीची प्रकरणे लवकर निकाली लागतील. या पोर्टलशी रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया आणि नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या दोन्ही संस्थांना जोडून घेण्याची चर्चा देखील प्राथमिक स्तरावर केली जात आहे.