चालू आर्थिक वर्षाच्या शेवटच्या जानेवारी-मार्च या चौथ्या तिमाहीत बँकांकडून कर्ज देण्याच्या प्रमाणात मोठी वाढ होईल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. उद्योग व्यवसायांना लागणाऱ्या कर्जाची तसेच उपभोग्य वस्तूंची बाजारातील मागणी वाढल्याने ही शक्यता निर्माण झाली आहे. मागील काही दिवसांत सरकारी बँकांनी खासगी बँकांपेक्षा चांगली कामगिरी केली आहे. तसेच नफ्याचे प्रमाणही चांगले आहे. मालमत्तांना कर्ज देण्यातील धोक्याचे प्रमाण कमी होत असल्याने येत्या काळात कर्ज देण्याचे प्रमाणही वाढेल, अशी शक्यता आहे.
"भारताच्या बँकिंग क्षेत्राने 2022 वर्षात सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मागील काही वर्षांमध्ये कमकुवत कामगिरी केली होती. मात्र, आता यामध्ये आता सुधारणा झाली आहे. बँकांचा ताळेबंद आता चांगला मजबूत झाला आहे", असे एमकाय ग्लोबल रिसर्च वरिष्ठ विश्लेषक आनंद दामा यांनी म्हटले आहे. ICICI, अॅक्सिस बँक, इंडसंड बँक, स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ बडोदा कडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
गृहखरेदी आणि वाहन कर्जामध्ये वाढ
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या ताज्या आकडेवारीनुसार कर्ज देण्याचे प्रमाण 2021 च्या नोव्हेंबर महिन्यात 18% होते. मात्र, हेच प्रमाण 2022 मध्ये 27% एवढे झाले. खर्चाचे प्रमाण वाढत असतानाही वैयक्तिक आणि कंपन्यांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण मागील वर्षातील उन्हाळ्यापासून वाढत आहे. वैयक्तिक कर्जामध्ये गृह आणि वाहन खरेदीसाठी सर्वात जास्त कर्ज देण्यात आले. उद्योगांना देण्यात येणाऱ्या कर्जाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहे. नोव्हेंबर महिन्यात वैयक्तिक कर्जाचे प्रमाण 13.1% आणि उद्योगांना देण्यात येणारे कर्ज 19.7% वाढले आहे.
व्याजदर वाढीचा परिणाम होणार का?
कोरोना काळात कर्ज वाटपाचे प्रमाण रोडावले होते. मात्र, त्यानंतर प्रत्येक महिन्यात वाढ झाली. 2020 आणि 2021 वर्षात कोरोनामुळे बँकाकडून क्रेडिट देण्याचे प्रमाण कमी झाले होते. मात्र, त्यामध्ये नंतरच्या काळात वाढ झाली. भांडवल आणि विकासाच्या संधी उपलब्ध असल्याने बँकांनीही चांगला नफा कमावला आहे. मात्र, वाढते व्याजदार सध्या चिंतेचा विषय बनला आहे. कारण, आरबीआयने नुकतेच रेपो रेट वाढवल्याने विविध प्रकारच्या व्याजदरात वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या काळात बँका कशी कामगिरी करतात हे पहावे लागेल.