दक्षिण अमेरिकेतील एक मोठा देश असलेल्या अर्जेंटिनामध्ये महागाईचा आगडोंब उसळला आहे. गेल्या वर्षाच्या तुलनेत महागाई तब्बल 80 टक्क्यांनी वाढली आहे. अन्नधान्य, साखर, फळे, भाजीपाला, दूध यासारख्या खाद्य वस्तूंच्या किंमतीत मागील सहा महिन्यात मोठी वाढ झाली आहे. दर आठवड्याला महागाई दुपटीने वाढत आहे. ज्यामुळे नागरिकांना वस्तूंची खरेदी करताना दुप्पट पैसे मोजावे लागत आहेत. चालू वर्षाच्या पहिल्या आठ महिन्यात महागाईचा दर 56.4% ने वाढला होता. मागील 12 महिन्यांचा विचार केला तर ऑगस्टमध्ये महागाईचा दर 78.5% ने वाढला आहे. (Argentina inflation rise record high)
देशांतर्गत बाजारपेठेत अन्नधान्यांचा पुरवठा सुरळीत राहावा, यासाठी सरकारने निर्यात शुल्क वाढवले आहे. सरकारने सोया ऑइल आणि सोयाबीन पीठाच्या निर्यात शुल्कात 2% वाढ करुन तो 33% केला. गहू आणि मक्यावर 12% निर्यात शुल्क लागू करण्यात आले आहे. वर्षअखेर महागाई 100% पर्यंत वाढेल, असे अंदाज सेंट्रल बँकेने व्यक्त केला आहे.
महागाईला आटोक्यात आणण्यासाठी अर्जेंटिनामधील अल्बर्टो फर्नांडेझ यांच्या सरकारने मोठे मॉल, सुपमार्केट्स आणि धान्य गोदामांवर लक्ष केंद्रित केले आहे. तेथील किंमतींचा आढावा घेतला जात आहे. आर्थिक स्थिती झपाट्याने खालावत आहे. अर्जेंटिनाचे चलन पेसोचे अवमूल्यन पाहता तेथील बड्या शेतकऱ्यांनी शेतमालाचा साठा दडवला असल्याचा आरोप अध्यक्ष फर्नांडेझ यांनी केला आहे.अर्जेंटिनामध्ये सोयाबीन, मका, गहू, बार्ली (जव) याचे प्रचंड उत्पादन घेतले जाते. मात्र बाजारातील अपुरा पुरवठा, चलनाचे अवमूल्यन आणि रशिया-युक्रेन युद्धाचा परिणाम यामुळे या देशात महागाईचा भडका उडाला आहे. अर्जेंटिनाच्या अर्थव्यवस्थेत कृषी क्षेत्राचा मोठा वाटा आहे. अर्जेंटिना मिळणाऱ्या प्रत्येक 3 डॉलर पैकी 2 डॉलर कृषी क्षेत्र मिळवून देते. त्यामुळे कृषी क्षेत्राने सरकारकडून पॅकेजची मागणी केली आहे.सरकारच्या अंदाजानुसार अर्जेंटिनातील शेतकऱ्यांकडे आजच्या घडीला 21.5 दशलक्ष टन सोयाबिनचा साठा आहे. देशातील एकूण सोया उत्पादनाच्या तुलनेत हे 49% आहे.
वर्षअखेर महागाई 100% ने वाढणार
महागाई रोखण्यासाठी सेंट्रल बँकेकडून व्याजदरात वाढ केली जाण्याची शक्यता आहे. त्याशिवाय अर्जेंटिनामधील सरकारला पेसोचे अवमूल्यन करावे लागण्याची शक्यता (Argentine peso) जाणकार व्यक्त करत आहेत.सध्या एक अमेरिकी डॉलरचे मूल्य 133 पेसो इतका आहे. महागाईचा ट्रेंड असाच वाढत राहिला तर या वर्षअखेर महागाई 100% ने वाढेल. महागाईमुळे तेथील सरकार देखील अस्थिर बनले आहे. सहा आठवड्यात तीन नवे अर्थमंत्री अर्जेंटिनावासीयांनी बघितले. मात्र महागाईचे व्यवस्थापन करण्यात सरकारला अद्याप यश आलेले नाही. युरोपातील देशांप्रमाणे अर्जेंटिनाचे दुखणे सारखेच आहे. रशिया आणि युक्रेन युद्धाची झळ अर्जेंटिनाला बसली आहे. जागतिक कमॉडिटी बाजारात क्रूड ऑईल आणि नॅचरल गॅसच्या किंमतीत वाढ झाल्याने अर्जेंटिनाची आयात बिले वाढली आहेत. तिजोरीत परकीय चलनाचा खडखडाट झाला आहे.
अर्जेंटिनातील महागाई भारताची डोकेदुखी वाढवणार
अर्जेटिनामधील वाढती महागाई भारतासाठीही डोकेदुखी वाढवणार आहे. अर्जेंटिनासाठी भारत हा चौथा मोठा ट्रेड पार्टनर आहे.भारत अर्जेंटिनाकडून खाद्य वस्तू आयात करतो.2021 मध्ये भारत आणि अर्जेंटिनामधील द्विपक्षीय ट्रेड 5.6 बिलियन डॉलर इतका होता. त्याशिवाय दोन्ही देशांनी स्थानिक चलनात व्यापार करण्याची तयारी दर्शवली आहे.