अॅपल कंपनीने आयफोन वापरणाऱ्या ग्राहकांना सुरक्षेच्यादृष्टीने सावधिगिरीचा इशारा दिला आहे. आयफोन चार्जिंगसाठी इतर कंपन्यांचा चार्जर वापरला तर तो व्होल्टेजच्या दृष्टीने योग्य नाही असे अॅपल कंपनीने म्हटले आहे. तसेच आयफोन किंवा चार्जर शेजारी झोपणे घातक असून यातून अपघात होऊ शकतो, असे अॅपल कंपनीने म्हटले आहे.
बरेच जण आयफोनचा चार्जर नसल्यास तात्पुरती सोय म्हणून इतर चार्जर किंवा थर्ड पार्टी चार्जरचा वापर करतात. मात्र यातून आयफोनसाठी आवश्यक वीजेचा दाब प्राप्त होण्याची शक्यता कमी आहे. आयफोनसाठी कंपनीने प्रमाणित केलेला योग्य व्होल्टेज पुरवणारा चार्जर वापरणे हिताचे आहे, असे अॅपलच्या सुरक्षा पत्रकात म्हटले आहे.
आयफोनसाठी अॅपलचा प्रमाणित चार्जर वापरणे योग्य आहे. त्याशिवाय चार्जिंग केबल तुटलेल्या किंवा खराब झालेल्या असतील तर त्याही टाळायला हव्यात. यातून अपघात होऊ शकतो, असा इशारा कंपनीने दिला आहे.
फोन चार्जिंगवेळी शरिराशी होणारा संपर्क टाळण्याचे आवाहन कंपनीने केले आहे. चार्जर किंवा फोनला चार्जिंगवेळी वीज प्रवाह सुरु असतो. अशावेळी शारिरिक संपर्क आल्यास दुखापत होऊ शकते, असे कंपनीने म्हटले आहे.
फोनजवळ झोपणे धोक्याचे
अॅपल कंपनीने ग्राहकांना आयफोनजवळ झोपण्याबाबत सावध केले आहे. आयफोन, पॉवर अॅडप्टर, वायरलेस चार्जर अशी उपकरणे वीज प्रवाह सुरु असताना चादरीमध्ये, उशीखाली, गादी खाली ठेवून झोपणे धोक्याचे असल्याचे म्हटले आहे. यामुळे दुर्घटना होऊ शकते आणि शारिरिक इजा होण्याची शक्यता कंपनीने व्यक्त केली आहे.
आयफोन-15 चे काउंटडाऊन
आयफोन-15 या लेटेस्ट आयफोन लॉंचिंगचे काउंटडाऊन सुरु झाले आहे. येत्या 12 किंवा 13 सप्टेंबर 2023 रोजी आयफोन 15 लॉंच होण्याची शक्यता आहे. आयफोनची पार्टनर कंपनी फॉक्सकॉनकडून भारतात आयफोन-15 चे उत्पादन घेतले जात असल्याचे बोलले जाते. आयफोन-15 ची सिरिज अधिकृतपणे लॉंच झाल्यानंतर काही आठवड्यातच तो भारतीय बाजारात उपलब्ध होणार आहे.