Amul Milk Price : अमूल कंपनीच्या दूधाच्या किमतीत नजीकच्या काळात दरवाढ होणार नसल्याचं कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक जितेन मेहता यांनी स्पष्ट केलंय. कोरोना नंतरच्या काळात अमूल उत्पादनांची विक्री समाधानकारक असल्यामुळे दरवाढीची गरज कंपनीला सध्या वाटत नाहीए. त्याचवेळी आणखी आक्रमक मार्केटिंग करून कंपनीला महसूल आणि विक्री आणखी वाढवायची आहे. त्यासाठीची रणनिती मेहता यांनी एका मुलाखतीत अलीकडेच सांगितली.
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या (GCMMF) वार्षिक उत्पन्नांमध्ये आर्थिक वर्ष 2021-22 च्या तुलनेत 18.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. यंदा गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनला 55,055 कोटी रूपये वार्षिक उत्पन्न मिळालं आहे. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनचे मॅनेजिंग डायरेक्टर जयेन मेहता यांनी पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत ते बोलत होते. यावेळी त्यांनी स्पष्ट केलं की, अमूलच्या विविध प्रोडक्ट्सची बाजारामध्ये उत्तमरीत्या विक्री होत असल्याने सद्धा अमूलच्या दुध दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली जाणार नाही.
वार्षिक उत्पन्न वाढीमागील कारणे
कोविड महामारीच्या काळानंतर ब्रँडेड डेअरी प्रॉडक्सच्या मागणीमध्ये प्रचंड वाढ झाल्याचे पाहायला मिळते. या कराणास्तव गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशनच्या वार्षिक उत्पन्नामध्ये चांगली वाढ झाल्याचे पाहायला मिळतेय. या पोस्ट कोविड काळामध्ये अमूल दुधाच्या सगळ्याच प्रोडक्ट्सच्या विक्रीमध्ये वाढ झाली आहे.
अमुल दूध दरांमध्ये का झाली होती वाढ
कोविड उद्रेकाच्या काळामध्ये म्हणजे 2020 आणि 2021 या सलग दोन वर्षामध्ये दुध दरामध्ये कोणत्याही प्रकारची वाढ केली नव्हती. मात्र, 2022 मध्ये अन्य खर्चामध्ये 15 टक्क्याची अनपेक्षित वाढ झाल्यामुळे सहकारी संस्थांना रिटेल बाजारामध्ये दुधाच्या दरामध्ये वाढ करावी लागली होती.
अमुलची पुढील ध्येय
गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन द्वारे सेंद्रीय (Organic) फूड आणि खाद्यतेलाचा सुद्धा व्यवसाय केला जातो. सद्धा छोट्या प्रमाणावर सुरू असलेल्या या व्यवसायाचे स्वरूप वाढवण्यावर फेडरेशन काम करत आहे. तसेच दक्षिण भारतामध्ये सुद्धा अमूल दुधाच्या माध्यमातून फेडरेशन चंचूप्रवेश करत आहे. दक्षिण भारतामध्ये सुद्धा अमूलला अशीच पसंत मिळाली तर कंपनीच्या विक्रीमध्ये आणखी भर पडेल. गुजरात को-ऑपरेटिव्ह मिल्क मार्केटिंग फेडरेशन द्वारे शेतकऱ्यांना 80टक्के नफा मिळवून देते. त्यामुळे अधिकाधिक दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांकडून फेडरेशनला मोठ्या प्रमाणावर दुध पुरवठा केला जात आहे.
त्यानुसार पुढील आर्थिक वर्ष म्हणजे 2023-2024 मध्ये वार्षिक उत्पन्नामध्ये 20 टक्क्याची वाढ होऊन 66 हजार कोटी रूपये उत्पन्न मिळू शकेल असा अंदाज वर्तवला आहे.